जान्हवी कपूरचा भक्तिभाव! गुडघे टेकत पायऱ्या चढून तिरुपती बालाजीच्या दर्शनाला, अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 04:29 PM2024-03-21T16:29:44+5:302024-03-21T16:30:06+5:30
गुडघे टेकत पायऱ्या चढली आणि घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन, जान्हवी कपूरचा व्हिडिओ समोर
जान्हवी कपूर ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची जान्हवी मुलगी आहे. जान्हवीने आईच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयात करिअर करायचं ठरवलं. श्रीदेवी यांच्याकडूनच तिने अभिनयाचे धडे घेतले. पण, जान्हवीने केवळ अभिनयच नाही तर श्रीदेवी यांचा धार्मिक भावही घेतला आहे. अनेकदा जान्हवी विविध मंदिरांना भेटी देताना दिसते. आता जान्हवीने तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं आहे.
जान्हवीबरोबर तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडिया आणि ऑरीनेदेखील तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं. याचा व्हिडिओ ऑरीने त्याच्या युट्यूब चॅनेलवरून शेअर केला आहे. या व्हिडिओत जान्हवी, शिखर आणि ऑरी तिरुपती मंदिराच्या जवळपास ३००० पायऱ्या चढत बालाजीच्या दर्शनाला गेले असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच शेवटच्या काही पायऱ्या ते गुडघे टेकत चढत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. हा व्हि़डिओ पाहून नेटकरी जान्हवीचं कौतुक करत आहेत.
दरम्यान, जान्हवी तिच्या नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'RC16' असं जान्हवीच्या आगामी सिनेमाचं नाव आहे. या सिनेमात ती दाक्षिणात्य अभिनेता राम चरणसह स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.