"मला आणि क्षितीला 'झिम्मा २' करायचा नव्हता", हेमंत ढोमेचा खुलासा, म्हणाला, "झिम्मानंतर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 11:36 AM2023-11-22T11:36:35+5:302023-11-22T11:37:14+5:30

हेमंत ढोमे आणि क्षिती जोगने मिळून 'झिम्मा' सिनेमाच्या निर्मितीची बाजू सांभाळली होती. पण, 'झिम्मा'चा सिक्वेल त्यांना करायचा नव्हता.

jhimma 2 hemant dhome and kshitee jog did not want to make remake of jhimma movie actor revealed | "मला आणि क्षितीला 'झिम्मा २' करायचा नव्हता", हेमंत ढोमेचा खुलासा, म्हणाला, "झिम्मानंतर..."

"मला आणि क्षितीला 'झिम्मा २' करायचा नव्हता", हेमंत ढोमेचा खुलासा, म्हणाला, "झिम्मानंतर..."

बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित 'झिम्मा २' हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०२१ साली प्रदर्शित झालेल्या 'झिम्मा' या सिनेमाचा हा सीक्वेल आहे. 'झिम्मा'नंतर 'झिम्मा २'ची प्रेक्षकांना उत्सुकता होती. 'झिम्मा'ला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर अखेर दोन वर्षांनी हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटाची संपूर्ण टीम सध्या 'झिम्मा २'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अशाच एका मुलाखतीत मला आणि क्षितीला 'झिम्मा २' करायचा नव्हता, असा खुलासा हेमंत ढोमेने केला आहे. 

२०२१ साली प्रदर्शित झालेल्या 'झिम्मा'मध्ये कलाकारांची तगडी फौज पाहायला मिळाली होती. या सिनेमात सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव, क्षिती जोग, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, निर्मिती सावंत हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. सात बायकांच्या लंडन ट्रिपची गोष्ट सांगणाऱ्या या सिनेमाला तुफान प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटानंतर 'झिम्मा २'ची चर्चा रंगू लागली होती. हेमंत ढोमे आणि क्षिती जोगने मिळून 'झिम्मा' सिनेमाच्या निर्मितीची बाजू सांभाळली होती. पण, 'झिम्मा'चा सिक्वेल त्यांना करायचा नव्हता. 'लोकसत्ता'ला दिलेल्या मुलाखतीत हेमंत ढोमेने याचा खुलासा करत त्यामागील कारणही सांगतिलं. तो म्हणाला, "झिम्मा सिनेमा बनवताना याचा सीक्वेल काढायचा कोणताही विचार नव्हता. झिम्माला मिळालेल्या प्रतिसादानंतर आम्ही सक्सेस पार्टी केली होती. तेव्हा या बायकांनी परस्पर याचा दुसरा भाग येतोय असं सांगून टाकलं होतं. तेव्हा स्क्रिप्ट किंवा गोष्ट असं काहीच ठरलं नव्हतं."

"त्यानंतर बरेच दिवस याबाबत चर्चा रंगली होती. पण, मला आणि क्षितीला 'झिम्मा २' करायचा नव्हता. आपल्याकडे ओढून ताणून चित्रपटाचे सीक्वेल केले जातात. एक दिवस आम्ही गप्पा मारत बसलो होतो. तेव्हा बोलता बोलता आता निर्मला काय करत असेल? कबीरचं काय झालं असेल? अशा चर्चा रंगल्या. त्यानंतर मग असं करू शकतो, हा विचार डोक्यात आला. मग आम्ही लेखिका ईरा कर्णिकला याबाबत विचारलं. तेव्हा सीक्वेल लिहिण्यात मला अजिबात रस नसल्याचं ती म्हणाली. पण, तुम्ही बोलताय ते गमतीशीर आहे. आपल्याला जर यात छान गोष्ट सापडली, तर आपण करूया...असं ती म्हणाली. त्यानंतर मग आम्ही गोष्ट तयार केली," असंही हेमंत ढोमेने सांगितलं. 

दरम्यान, येत्या २४ नोव्हेंबरला 'झिम्मा २' सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सुहास जोशी, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू, सायली संजीव, सिद्धार्थ चांदेकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

Web Title: jhimma 2 hemant dhome and kshitee jog did not want to make remake of jhimma movie actor revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.