Death Anniversary : चटका लावणारा होता जिया खानचा मृत्यू; ‘त्या’ रात्री घडले होते असे काही!!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 10:19 AM2019-06-03T10:19:21+5:302019-06-03T10:21:52+5:30
बॉलिवूड अभिनेत्री जिया खानने सन २०१३ मध्ये आजच्याच दिवशी आत्महत्या करून आयुष्य संपवले होते. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी जगाला अलविदा म्हणणाऱ्या जियाच्या मृत्यूचे रहस्य अद्यापही उलगडलेले नाही.
बॉलिवूड अभिनेत्री जिया खानने सन २०१३ मध्ये आजच्याच दिवशी आत्महत्या करून आयुष्य संपवले होते. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी जगाला अलविदा म्हणणाऱ्या जियाच्या मृत्यूचे रहस्य अद्यापही उलगडलेले नाही. तिच्या आत्महत्या प्रकरणी तिचा कथित बॉयफ्रेन्ड सूरज पंचोलीला अटक करण्यात आली होती. सध्या सूरज जमिनावर बाहेर आहे. जिया खान प्रकरणाचा खटला अजूनही सुरू आहे.
२००७ साली ‘नि:शब्द’ या सिनेमाद्वारे बॉलिवूड करिअरला सुरुवात करणारी जिया काम मिळत नसल्यामुळे ती नैराश्येने ग्रस्त होती. अखेर तिने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली, असे काही जणांचे म्हणणे आहे. तर काहींच्या मते, बॉयफ्रेंडसोबत निर्माण झालेल्या दुराव्यामुळे तने आत्महत्या केली. जियाची आई राबिया खान यांचे मते, जियाने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे. अद्याप तिच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.
२० फेबु्रवारी १९८८ रोजी न्यूयॉर्कमध्ये जियाचा जन्म झाला. पण तिचे बालपण लंडनमध्ये गेले. तिचे खरे नाव नफीसा खान आहे. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी तिने तिचे नाव जिया खान असे ठेवले.
जिया खान पूर्वाश्रमीची अभिनेत्री राबिया आमीन यांची मुलगी आहे. राबियाने अनेक चित्रपटात काम केले होते. जियाने उर्मिला मातोंडकरचा ‘रंगीला’ हा सिनेमा पाहून अभिनेत्री होण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी ती केवळ सहा वर्षांची होती.
‘दिल से’ या चित्रपटातून तिने बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली. यात जियाने मनीषा कोईरालाच्या बालपणीची भूमिका साकारली होती.
जिया एक ओपेरा सिंगर होती. १६ व्या वर्षांत तिने ६ पॉप ट्रॅक रेकॉर्ड केले होते. १६ वर्षांच्या जिया मुकेश भट्टची ‘तुमसा नहीं देखा’साठी पहिली चॉईस होती. जियाने हा चित्रपट साईनही केला. पण नंतर ती या चित्रपटातून बाहेर पडली होती. याचे कारण म्हणजे, वयाच्या हिशेबाने जियाला ही भूमिका अतिशय मोठी वाटली होती. नंतर ही भूमिका दिया मिर्झाने केली होती.
अलीकडे सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रातून जियाच्या आत्महत्येविषयी काही नव्या गोष्टी समोर आल्या आहेत. जियाच्या मृत्यूपूर्वी सूरजसोबतचे तिचे संबंध अतिशय बिघडलेले होते. असा खुलासा या आरोपपत्रातून झाला आहे.
जियाच्या मृत्यूच्या तासभर आधी सूरजने तिला १० मेसेज पाठवले होते. ज्यात अतिशय वाईट भाषा आणि शिव्यांचा वापर करण्यात आला होता. संबंधित आरोपपत्रानुसार, आत्महत्येच्या दिवशी जिया सूरजला सतत फोन करत होती. पण रात्री १० वाजून २२ मिनिटांपर्यंत सूरजने तिच्या एकाही कॉलचे उत्तर दिले नाही त्यामुळे ती त्याच्या घरी गेली होती. तिने सूरजच्या नोकराकडे त्याची चौकशी केली. त्यावर सूरजचा फोन आॅफ असून तो आपल्या वडीलांसोबत मिटिंगमध्ये असल्याचे त्याच्या नोकराने तिला सांगितले. त्यानंतर जिया काही काळ त्याच्या घराबहेर थांबली आणि मग तिथून निघून गेली.
सूरजने जियाला बोलवण्यासाठी एका माणसाला पाठवले. पण तोपर्यंत जिया तिथून निघून आपल्या घरी गेली होती. सूरजने तिला फोन करण्याचा प्रयत्न केला पण तिने फोन उचलला नाही. यानंतर सूरजने तिला १० मेसेज केले. ज्यातील भाषा अतिशय वाईट होती आणि यात शिव्यांचाही वापर करण्यात आला होता. सूरजने केलेल्या या सर्व मेसेज नंतर बरोबर तासाभराने जियाने आत्महत्या केली. त्यामुळे पोलिसांनी सूरजवर जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.