जिंकलस भावा..!, दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूने दत्तक घेतलेल्या गावात राबवली लसीकरण मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 11:41 AM2021-06-10T11:41:07+5:302021-06-10T11:41:38+5:30
महेश बाबूने आंध्रप्रदेशमधील दत्तक घेतलेल्या गावात लसीकरण मोहीम राबवल्यामुळे त्याचे खूप कौतुक होत आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू कोरोना काळात अनेकांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. दरम्यान महेश बाबूने आंध्रप्रदेशमधील दत्तक घेतलेले गाव बुरिपालेममध्ये सात दिवसात कोरोना लसीकरण मोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. त्याची पत्नी आणि निर्माती नम्रता शिरोडकर हिने नुकतीच ही माहिती दिली.
मागील महिन्यात अभिनेता महेश बाबूने घोषणा केली होती की, त्याचे वडील आणि अभिनेते, निर्माते कृष्णा यांचे जन्मस्थान बुरिपालेममधील लोकांचे लसीकरण करणार आहे. २०१५ साली महेश बाबूने हे गाव दत्तक घेतले होते.
पुकार, वास्तव या सारख्या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री नम्रता शिरोडकरने आंध्र हॉस्पिटलच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण शिबिराचे फोट इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटो शेअर करून तिने लिहिले की, बुरिपालेममध्ये सात दिवसीय लसीकरण मोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाली. स्वतःच्या गावात लसीकरण केल्यामुळे आणखी आनंदाची वार्ता काय असू शकते. तुमच्या पाठिंब्यासाठी आभारी आहे महेश बाबू. आमच्या सर्व ग्रामीणांचे खूप खूप आभारी आहोत जे लस घेण्यासाठी पुढे आले.
नम्रता शिरोडकर म्हणाली की, लसीकरण सध्या काळाची गरज आहे आणि तिने आपल्या चाहत्यांना लवकर लस घेण्याचे आवाहन केले.
महेश बाबूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तो मधु मंटेना यांच्या थ्रीडी रामायणमध्ये दिसणार असल्याचे बोलले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दक्षिण सुपरस्टार महेश बाबूला या सिनेमासाठी अप्रोच करण्यात आले आहे. '3D रामायण'मध्ये हृतिक रोशन 'राम' च्या भूमिकेत दिसणार नाही. सध्या महेश बाबूबरोबर चर्चा सुरू आहे. महेश बाबूलाही याची पटकथा आवडली आहे. तथापि, यासाठी त्याने अद्याप होकार दिलेला नाही.