जॉन अब्राहमकडे आहेत कोट्यवधींच्या कार पण आई-वडील आजही करतात बसने प्रवास; 'हे' आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 04:48 PM2022-01-31T16:48:00+5:302022-01-31T16:50:16+5:30
John Abraham : कोट्यवधींचा मालक असलेल्या जॉनचे आई-वडील मात्र ऑटो आणि बसने प्रवास करतात. हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे.
नवी दिल्ली - बॉलिवूड अभिनेता (Bollywood actor) जॉन अब्राहमने (John Abraham) आपल्या मेहनतीच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीत यश संपादन केलं आहे. त्यांच्या फिटनेसची नेहमीच चर्चा सुरू असून तरुणांमध्ये त्याची क्रेझ पाहायला मिळत आहे. सध्या तो सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत अनेक गोष्टी शेअर करत असतो. जॉन बॉलिवूडमधील महागड्या कलाकारांपैकी एक आहे. तो एका चित्रपटासाठी तब्बल 15 कोटी रुपये मानधन घेतो, असं म्हटलं जातं. जॉनकडे भरपूर संपत्ती देखील आहे. त्याच्याजवळ महागडी घरं आणि गाड्या आहेत.
कोट्यवधींचा मालक असलेल्या जॉनचे आई-वडील मात्र ऑटो आणि बसने प्रवास करतात. हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. केरळमधील कोच्ची येथे 17 डिसेंबर 1972 मध्ये जॉनचा जन्म झाला. लोकप्रिय अभिनेत्याचे आई-वडील असूनही जॉनचे आई-वडील अतिशय साधे आहेत. जॉनचे वडील अजूनही कुठेही प्रवास करण्यासाठी सार्वजनिक वाहनांचा वापर करतात, तर त्याची आई ऑटोने प्रवास करते. जॉन अब्राहमचे आई-वडील खूप साधे आहे, त्यांना साधं राहायला आवडतं. त्यामुळे ते कुठेही जाण्या-येण्यासाठी सार्वजनिक वाहनांचा वापर करतात.
एका मुलाखतीत जॉन म्हणाला होता की, "माझे वडील अजूनही सार्वजनिक वाहनांने प्रवास करणं पसंत करतात. तर माझी आई ऑटोने प्रवास करते. या दोघांनाही साधं आणि सामान्यपणे जगायला आवडतं." जॉन स्वतः देखील फार साधं आयुष्य जगतो. तो बॉलिवूडच्या हाय-फाय पार्ट्यांमध्ये अनेकदा साधा टी-शर्ट, जीन्स आणि चपला घालून आलेला दिसतो. याबद्दल जॉन अब्राहम सांगतो की, त्याचे सहकलाकार त्याला अनेकदा विचारतात की तो पार्टीत शूज का घालत नाही? तर यावर तो उत्तर देतो की तो चप्पल घालणं पसंत करतो, त्याला चप्पल जास्त कंफर्टेबल वाटतात.
एका मुलाखतीत जॉनने सांगितलं होतं की, "मी अतिशय साध्या कुटुंबातून आलो आहे. मी स्वत: खूप साधा आहे. माझे सहकलाकार अनेकदा माझ्याकडे तक्रार करतात की, तुम्ही कोणत्याही फंक्शनमध्ये किंवा पार्टीमध्ये बूट घालत नाही. मी त्यांना सांगतो की मला चप्पल वापरणं अधिक चांगलं वाटतं. मला माझे मीडल क्लास संस्कार माहीत आहेत हाच माझा प्लस पॉईंट आहे." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.