Attack Movie review: ‘सुपर सोल्जर’ जॉनचा जबरदस्त ‘अटॅक’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 11:51 AM2022-04-01T11:51:37+5:302022-04-01T11:52:52+5:30

Attack Movie review in marathi : जॉन म्हटल्यानंतर सिनेमात धमाकेदार अ‍ॅक्शन असणार, हे ओघानं आलंच. याशिवाय सिनेमात वेगळं काय आहे तर हा जबरदस्त अ‍ॅक्शन असलेला  हा एक सायन्स फिक्शन सिनेमा आहे.

John Abraham Rakul Preet Singh Attack Movie review in marathi | Attack Movie review: ‘सुपर सोल्जर’ जॉनचा जबरदस्त ‘अटॅक’!!

Attack Movie review: ‘सुपर सोल्जर’ जॉनचा जबरदस्त ‘अटॅक’!!

googlenewsNext

कलाकार - जॉन अब्राहम, रकुल प्रीत सिंग, जॅकलिन फर्नांडिस, प्रकाश राज
दिग्दर्शक- लक्ष्य राज आनंद
अवधी- 2 तास 3 मिनिटं

Attack Movie review in marathi : बॉलिवूडचा अ‍ॅक्शन स्टार जॉन अब्राहमचा (John Abraham) ‘अटॅक 1’ (Attack Movie) हा सिनेमा रिलीज झालाये. गेल्या अनेक दिवसांपासून जॉनचे चाहते या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. अखेर आज 1 एप्रिलला हा सिनेमा चित्रपटगृहांत झकळला. जॉन म्हटल्यानंतर सिनेमात धमाकेदार अ‍ॅक्शन असणार, हे ओघानं आलंच. याशिवाय सिनेमात वेगळं काय आहे तर हा जबरदस्त अ‍ॅक्शन असलेला  हा एक सायन्स फिक्शन सिनेमा आहे. यात देशभक्ती आहे, देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि सोबत एक ‘सुपर सोल्जर’ आहे. आता हा ‘सुपर सोल्जर’ तुम्हाला चित्रपटगृहांपर्यंत खेचून नेऊ शकतो की नाही, याचा निर्णय हा रिव्ह्यू वाचून तुम्हाला घ्यायचा आहे.

कथा
‘अटॅक’ या चित्रपटाची सुरूवात होते ती इंडियन आर्मीच्या स्ट्राईकने. इंडियन आर्मी अतिरेक्यांच्या तळांवर स्ट्राईक करते. येथे आर्मी ऑफिसर अर्जुन शेरगिल (जॉन अब्राहम) एका कट्टर अतिरेक्याच्या मुसक्या बांधण्यात यशस्वी होतो. हे मिशन संपवून अर्जुन दीर्घकाळानंतर सुट्टीवर निघतो.  फ्लाइटमध्येच त्याला आयशा (जॅकलिन फर्नांडिस)भेटते. दोघं पहिल्याचं नजरेत प्रेमात पडतात आणि गोष्ट लाईफपार्टनर बनण्यापर्यंत पोहोचते. पण अचानक देशातील एका मोठ्या एअरपोर्टवर अतिरेकी हल्ला होतो आणि हा हल्ला अर्जुन व आयशाचं अख्खं आयुष्य बदलवून टाकतो. प्रेम दुरावतं, या हल्ल्यात अर्जुन गंभीर जखमी होतो. संपूर्ण शरीर पॅरालाइज्ड होऊन अर्जुन व्हिल चेअरवर येतो आणि इथून पुढे त्याच्या ‘सुपर सोल्जर’ बनण्याचा प्रवास सुरू होतो. चित्रपटात रकुल प्रीत सिंगने  आर्टिफिशिअल इंटेलिजन्स एक्स्पर्ट  जियाची भूमिका साकारली आहे. तिच्याच प्रोजेक्टचा भाग बनून अर्जुन सुपर सोल्जर बनतो आणि देशाला दहशतवाद्यांपासून वाचवतो. जियाचा प्रोजेक्ट नेमका काय असतो? अर्जुन अतिरेक्यांना कशी मात देतो? हे बघण्यासाठी तुम्हाला चित्रपटगृहांत जाऊन सिनेमा बघावा लागेल.

अभिनय
जॉन अब्राहमचे आत्तापर्यंतचे अनेक अ‍ॅक्शन सिनेमे तुम्ही पाहिले असतील. जॉन आता ‘अ‍ॅक्शन’ सिनेमांचा ‘मास्टर’ बनला आहे. पण या चित्रपटात तो सुपर सोल्जरच्या भूमिकेत आहे.  त्याचे अ‍ॅक्शन सीन्स, फाईट सीन्स, बाईक्स सीन्स जबरदस्त आहेत. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स एक्स्पर्टच्या भूमिकेत रकुलप्रीतनेही तिच्या वाट्याची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. जॉनची पे्रमिका बनलेली जॅकलिन काही ठिकाणी खटकते. दोघांचे काही रोमॅन्टिक सीन्स अगदीच फनी वाटतात. प्रकाश राज यांनी नेहमीप्रमाणे आपली भूमिका जीव तोडून साकारली आहे.

कथा व दिग्दर्शन
अटॅक हा सिनेमा लक्ष्य राज आनंद यांनी दिग्दर्शित केला आहे. हा त्यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा. याआधी ‘एक था टायगर’ आणि ‘बँग बँग’ सारख्या सिनेमांचे अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलेल्या लक्ष्य राज आनंद यांनी या सिनेमात अपेक्षेपेक्षा अधिक चांगला परफॉर्मन्स दिला आहे. पहिल्या पार्टमध्ये जॉन लव्हरबॉय बनलेला दिसतो. त्याचा ‘बळजबरीचा’ रोमान्स  अनेकदा खटकतो.  सेकंड हाफमध्ये मात्र सायन्सचा तडका आणि जबरदस्त अ‍ॅक्शन पाहायला मिळते. जॉनचे त्याच्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स पार्टनर इरा सोबतचे डायलॉग ऐकताना मज्जा येते. इराचे पंच लिहिणाऱ्या लेखकाचं यासाठी कौतुक करावंच लागेल. तांत्रिकदृष्ट्या सिनेमा बऱ्यापैकी अपेक्षा पूर्ण करतो. काही सीन्समध्ये ब्रॅकग्राऊंड म्युझिक विसंगत वाटतं. चित्रपटातील अ‍ॅक्शन दृश्ये काही जणांना ‘लॉजिकलेस’ वाटू शकतात, अर्थात त्यात ‘लॉजिक’ शोधणार असाल तर.

का पाहावा सिनेमा?
अटॅकचा फर्स्ट हाफ सिनेमाचा प्लॉट तयार करण्यात खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे सुरूवातीला सिनेमाच्या कथा बेचव वाटते. पण हळूहळू  हा सिनेमा खिळवून ठेवतो. वास्तवाशी काहीही संबंध नसलेला हा सिनेमा कुठल्याही अपेक्षेशिवाय पाहत असाल तर तो तुम्हाला आवडू श्कतो. पण यात लॉजिक शोधण्याचा प्रयत्न केला तर तो तुम्हाला निराश करू शकतो. शेवटी एकच जॉनचे चाहते असाल आणि जबरदस्त अ‍ॅक्शनचे ‘दिवाने’ असाल तर चित्रपट एकदा पाहायला हरकत नाही.  

Web Title: John Abraham Rakul Preet Singh Attack Movie review in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.