‘जर्नी टू दि सेंटर आॅफ दि हार्ट..’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2017 05:52 AM2017-07-05T05:52:49+5:302017-07-05T05:52:49+5:30
धबधब्यात आमची धमाल मस्ती चालू असताना आमच्यातल्या एका मित्राला बाजूच्या खेड्यातलं एक जोडपं थोड्याशा अंतरावर धबधब्याजवळ काहीतरी
-आदिनाथ कोठारे
धबधब्यात आमची धमाल मस्ती चालू असताना आमच्यातल्या एका मित्राला बाजूच्या खेड्यातलं एक जोडपं थोड्याशा अंतरावर धबधब्याजवळ काहीतरी शोधताना दिसलं. तो त्यांना विचारायला गेला. तोपर्यंत आम्ही दोघं त्या धबधब्याची खूप मजा घेत होतो. त्या धबधब्याच्या आवाजात लांबचं काही ऐकू येणं शक्यच नव्हतं. धबधबा आपला प्रायव्हेट जॅकूझी आहे, अशा गैरसमजात मी असताना, माझी नजर सहज वरच्या बाजूला गेली. माझा मित्र जो त्या जोडप्याला विचारायला गेला होता, तो जिवाच्या आकांताने ओरडून आम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करीत होता. आम्हा दोघांना काहीच कळत नव्हतं. धबधब्याखालून जेव्हा मी डोकं बाहेर काढलं तेव्हा त्याच्या तोंडातून निघालेल्या शब्दांतला फक्त शेवटचा शब्द जो मला आणि माझ्या दुसऱ्या मित्राला ऐकू आला, तो म्हणजे ‘साप!’
दुसऱ्या कुठल्या शब्दाची आम्हाला गरजच नाही भासली. आपल्या प्रायव्हेट जॅकूझीचं आपलं बुकिंग संपलं आहे, असं आम्हाला त्या क्षणी कळलं. कुल्याला पाय लावून आम्ही डायरेक्ट पँट घालत रस्त्यावर प्रकट झालो. थोड्या वेळाने भानावर आल्यावर खूप हसलो आणि त्या प्रसंगाची खूप मजाही वाटली. उसनं धाडस करून ‘चला बघुया तरी कुठे आहे तो साप’ असा बेतही मांडला. पण आता तिघांनाही छान आंघोळ झाल्यावर खूप भूक लागली होती.
आजूबाजूला छोटी छोटी खेडी होती. आम्ही गाडीत बसून कुठे काही खायला मिळेल का, शोधायला लागलो. एक दोन खानावळी दिसल्या, पण त्यात फार काही रस नाही वाटला. आपण एके ठिकाणी जेव्हा प्रवास करतो, तो प्रवास त्या ठिकाणातल्या खास किंवा अस्सल जेवण पद्धतीची चव घेतल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. तिकडच्या अस्सल खाद्यपदार्थांची चव घेतल्याशिवाय आपल्याला त्या ठिकाणची ओळख पटूच शकत नाही. ज्या पद्धतीने आपण एका व्यक्तीची ओळख पटवून घेण्यासाठी त्याच्याशी बोलतो, चर्चा करतो, तशाच पद्धतीने एका गावाची ओळख पटवून घेण्यासाठी त्या गावातलं अस्सल जेवण जेवावच लागतं.
आम्ही गाडी लावली आणि खेड्यात चालत आत शिरलो. आम्हाला एक छोटीशी झोपडी दिसली, जी बऱ्यापैकी नीटनेटकी होती. त्या झोपडीच्या दारापाशी जाऊन मी विचारलं ‘कोणी आहे का?’
एक चाळिशीतली बाई दारापाशी आली. आम्हा तिघा पुरुषांना बघून थोडी हादरली. मग पदर डोक्यावर घेत थोडी सावध होऊन म्हणाली ‘कोण?’
मी तिला सांगितलं, ‘आम्ही मुंबईहून आलो आहोत. आम्हाला त्रास नाही द्यायचाय, पण आम्हाला खूप भूक लागली आहे. आम्ही तुम्हाला ५०० रुपये देऊ. काही वेगळं किंवा खास करायची गरज नाही. तुम्ही जे घरात रोज बनवून जेवता आम्हाला अगदी तेच हवंय.’
५०० रुपये ऐकून त्या बिचाऱ्या गरीब बाईचे डोळेच फिरले. ती खूप खूश झाली. म्हणाली, ‘पाऊण तास लागल जेवण बनवायला.’ मी म्हणालो, ‘काही हरकत नाही, तुम्ही तुमचा वेळ घ्या, आम्ही येऊ पाऊण तासाने,’ असं म्हणून आम्ही तिथून निघालो.
मला त्या बाईच्या धाडसाबद्दल खरंच नवल आणि अभिमान वाटला. एका छोट्या खेड्यातली एक गरीब बाई जी आधी तीन पुरुषांना बघून थोडी घाबरली होती, तिने ५०० रुपयांसाठी ह्या तीन अनोळखी पुरुषांवर विश्वास ठेवण्याचं धाडस पत्करलं. तिच्यासाठी ते ५०० रुपये म्हणजे एक महिन्याचा घरचा निम्मा किंवा संपूर्ण खर्चच असावा. परिस्थिती माणसाला धाडसी बनवतेच.
आम्ही पाऊण तास निसर्गाची टेहळणी करीत घालवला. काही धबधबे, एक नदी धुक्याच्या थरात लपलेली, रस्त्याच्या कडेला पसरून ठेवलेले गवताचे हिरवे गालिचे अशा वातावरणात आणखी मंत्रमुग्ध होऊन आम्ही पाऊण तासांनंतर त्या बाईच्या झोपडीपाशी पुन्हा पोहोचलो.
अळूची भाजी, तुरीची डाळ, त्यांच्याच शेतातला भात आणि चपाती. असा साधा अस्सल बेत आमच्यासाठी त्या बाईने मांडला होता. आम्ही त्या जेवणावर तुटून पडलो. प्रत्येक घासात त्या गावाची अस्सल चव, त्या घराची परिस्थिती, त्या घरातल्या माणसामधील साधेपणा, तिला मदत केल्याने तिला झालेला आनंद आणि त्यातून उमटणारे प्रेम सतत भासवत आणि डोकावत होते.
आम्ही जेवत असताना त्या बाईच्या चेहऱ्यावर एक अस्वस्थपणा जाणवत होता. मी जेव्हा तिला कारण विचारलं तेव्हा ती म्हणाली, ‘माझ्या नवऱ्याला कळलं तर मारणार मला.’ आम्हाला काय बोलावं काहीच कळेना. आमचं जेवण संपणारच होतं इतक्यात ती घाईघाईने बाहेर गेली. काही मिनिटांतच ती धावत आत आली. ती भीतीने थरथरत होती. तिचा नवरा आला होता. कुठल्याही क्षणी तो घरात येणार होता.
आम्ही ताटावरून उठणारच होतो जेव्हा तिचा नवरा घरात शिरला. त्या बाईला आत घाम फुटला होता. आम्ही तिघांना बघून तोही चपापला. त्याच्या बायकोने लगेच आम्ही तिला दिलेली ५००ची नोट त्याच्यासमोर धरली आणि त्याला सगळं थरथरत्या आवाजात सांगायला लागली. नवरा खूप तापलेला, पण आमच्यासमोर राग लपवण्याचा प्रयत्न करत होता.
मी लगेच उठून तिच्या नवऱ्याला सगळं नीट समजावलं. माझी ओळख पटवून दिली. माझं बोलणं ऐकून तो थोडा शांत झाला आणि कसंनुसं हसला.
आम्ही त्यांचे इतके सुंदर जेवण दिल्याबद्दल आणि पाहुणचार केल्याबद्दल आभार मानले आणि निघालो.
आम्ही गेल्यावर त्या नवऱ्याने तिच्यावर हात उगारला असेल का? का ५०० रुपये हुशारीने कमावल्याबद्दल आनंद व्यक्त केला असेल? तिला मारझोड करून राग शांत झाल्यावर ५०० रुपयांकडे बघून मनातल्या मनात सुखावला असेल का?
पण त्या बाईला सलाम!! नवऱ्याची वृत्ती माहीत असूनही, घरच्या परिस्थितीकडे बघून तिने हे धाडस केलं. परिणाम तिला माहीत होता. कदाचित तिला सवयही झाली असावी.
पण त्या नवऱ्याने तिला मारझोड करायला नको... रागवावं हवं तर तिच्यावर, पण मारझोड करायला नको. तसं बघायला गेलं तर त्याचा रागपण बरोबर आहे. तीन अनोळखी पुरुषांना एका खेड्यातली बाई कोणीही नसताना ५०० रुपयांसाठी घरात घेते आणि जेवायला वाढते. आम्ही चांगल्या घरातील मुलं होतो म्हणून... पण दुसरं कोण असतं तर? पण हे त्या गृहिणीला नक्कीच कळलं असणार. म्हणूनच तर तिने आम्हाला जेवायला वाढलं.
पण काहीही असो, कुठल्याही पुरुषांनी स्वत:च्या बायकोला कधीही मारझोड करू नये... त्यातून तो फक्त त्याचा पुरुषार्थ गमावून बसतो.
ती गृहिणी हुशार होती, धीट होती.
ह्या अशा सुंदर निसर्गाच्या कुशीत राहणारी माणसं एवढं कठीण आयुष्य का जगतात? यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. नाही तर सगळ्या निसर्गाचे क्राँक्रिट जंगल होईल आणि सगळ्या हृदयातील निसर्ग नष्ट होतील.
आम्ही तिघे सुन्न होऊन परतीचा प्रवास साधत होतो. कल्याण येईपर्यंत कोणीही एक शब्द उच्चारलेला मला आठवत नाही. त्या परतीच्या प्रवासात आमच्या स्वत:च्या हृदयातल्या निसर्गाचा शोध सुरू झाला होता. जो आजही सुरू आहे आणि आयुष्यभर चालतच राहणार