‘मुन्ना मायकल’पर्यंतचा प्रवास सोपा नव्हता...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2017 02:26 AM2017-07-15T02:26:29+5:302017-07-15T02:26:29+5:30
अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री निधी अग्रवाल यांच्या ‘झुमके’ स्टाईलने नागपूरकरांना अगदी बेभान केले.
-Meha Sharma
लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत आणि तरुणींच्या ‘दिल की धडकन’ असलेला अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री निधी अग्रवाल यांच्या ‘झुमके’ स्टाईलने नागपूरकरांना अगदी बेभान केले. जगप्रसिद्ध पॉपस्टार मायकल जॅक्सनच्या स्मृतिदिनानिमित्त आणि ‘मुन्ना मायकल’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी टायगर व निधी नुकतेच नागपुरात आले होते. ‘लोकमत’ व ‘प्रीती आयआयटी पिनॅकल’तर्फे हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. यावेळी निधी अग्रवाल हिच्याशी गप्पा रंगल्या. त्या गप्पांचा हा सारांश...
प्रश्न : पहिला ब्रेक, पहिला चित्रपट काय सांगशील याबद्दल?
निधी : माझा आणि बॉलिवूडचा दूरदूरपर्यंत संबंध नव्हता. त्यामुळे पहिला ब्रेक, तोही टागयर श्रॉफसोबत ही माझ्या दृष्टीने स्वप्नपूर्तीच आहे. गेल्या दोन वर्षांपासून बॉलिवूडमध्ये मी स्ट्रगल करत होते. यादरम्यान मला ‘मुन्ना मायकल’चा प्रस्ताव आला. मग आॅडिशन्सचे सोपस्कार झालेत. आॅडिशन्सचे चार राऊंड्स झालेत. या कसोटीत खरी उतरल्यानंतर कुठे स्वप्नपूर्तीचा प्रवास सुरु झाला. टायगर श्रॉफ या चित्रपटात माझा हिरो असणार, हे कळते, त्याक्षणाला मी नुसते हवेत होते. माझे स्वप्न सत्यात उतरले.
प्रश्न : अभिनेत्रीचं व्हायचे, हे तू कधी ठरवलेस?
निधी : अगदी लहानपणापासून. हिरोईन होण्याचे स्वप्न मी अगदी लहानपणापासून बघत होते. मला चित्रपटचं करायचे होते. पण मी एका सामान्य कुटुंबातील, एक सामान्य मुलगी होते. त्यामुळे अभिनेत्री बनायचे, हे तर ठरलेले होते. पण अनेकदा मी इथपर्यंत कशी पोहोचणार, हा प्रश्न मी स्वत:लाच विचारायचे.
प्रश्न : तुझा इथपर्यंतचा संघर्ष, प्रवास याबद्दल काय सांगशील?
निधी : मी मॉडेलिंगपासून सुरुवात केली. दोन ते तीन महिने मी मॉडेलिंग केले. यानंतर साऊथचे काही चित्रपट केलेत. यानंतर कुठे मी अभिनय करू शकते, हा आत्मविश्वास माझ्यात आला. यानंतर मुंबईत जाण्याचा निर्णय मी घेतला. मुंबईत आल्यानंतर मग सुरु झाला तो संघर्ष. पण या प्रवासात खूप काही शिकायला मिळाले.
प्रश्न : नेपोटिझमबद्दल(बॉलिवूडमधील घराणेशाही) तुझे मत काय?
निधी : माझे डॅड टायरचा बिझनेस करतात. माझा बॉलिवूडशी दूरदूरपर्यंत संबंध नाही, हे खरे आहे. असे असताना बॉलिवूडमध्ये येण्याचे स्वप्न बघतानाही घाबरायला व्हायचे. पण स्वत:वर विश्वास असेल तर स्वप्नाचा पिच्छा सोडायला नसतो. मी हेच केले. पण नेपोटि-झमबद्दल बोलायचे तर बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक मिळवणे आऊटसा-ईडरसाठी सोपे नाही. हे खरोखरच अतिशय कठीण आहे.
प्रश्न : स्ट्रगलर म्हणून सगळ्यात मोठे आव्हान कुठले होते?
निधी : माझे कुटुंब बेंगळुरुला आणि मी मुंबईत एकटी. त्याकाळात मला ‘सपोर्ट सिस्टिम’ नसल्यासारखे वाटायचे. प्रत्येक सकाळी मी स्वत:ला नव्या दिवसासाठी तयार करायचे. स्वत:च स्वत:ला प्रेरणा द्यायचे. ते दिवस फार कठीण होते. या स्ट्रगल पीरियडमध्ये योग्य माणसे निवडणे, फार महत्त्वाचे असते. तुमच्या करिअरसाठी मदत करणारे, तुम्हाल प्रोत्साहन देणारी माणसे वाट्याला येणे, हे इथले सगळ्यात मोठे आव्हान होते. मी हे आव्हानही अगदी यशस्वीपणे पेलले.
प्रश्न : निधी अग्रवाल ही ‘पार्टी पर्सन’ आहे, असे म्हटलेले तुला आवडेल?
निधी : कदाचित नाही. मी ‘पार्टी पर्सन’ नाहीच. माझ्या मते, मी बेंगळुरूमध्ये असले की, खऱ्या अर्थाने ‘पार्टी पर्सन’ असते. मी स्वत: डेडलाईन पाळणारी आहे.
प्रश्न : ‘मुन्ना मायकल’ मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीही आहे. नवाजसोबत काम करण्याचा तुझा अनुभव कसा राहिला?
निधी : एकंदर ‘मुन्ना मायकल’चा अनुभवच अद्भूत होता. प्रतिभावान कलाकार, चांगली स्क्रिप्ट, स्वत:तील डान्स टॅलेन्ट जगाला दाखवण्याची संधी, असे सगळे काही मला या चित्रपटाने दिले. यापेक्षा दुसरा मोठा ब्रेक माझ्यासाठी असूच शकत नाही. त्यातही नवाजुद्दीन सिद्दीकी सारख्या अभिनेत्यासोबत काम करण्याची संधी मिळणे, हे माझे नशीब. कॅमेऱ्यासमोर नवाज अतिशय प्रामाणिक असतो. त्याचा तो प्रामाणिकपणा त्याच्या अभिनयात दिसतो. मी त्याच्याकडून खूप काही शिकले.
प्रश्न : या पहिल्या चित्रपटाने तुला खऱ्या अर्थाने काय दिले?
निधी : कितीही यश मिळवा, पण पाय नेहमी जमिनीवर असू द्या, हेच मी या चित्रपटातून शिकले. टायगरने मला प्रचंड मदत केली. मी नवखी होते. पण त्याने जराही अॅटिट्यूड दाखवला नाही. उलट माझ्या डेब्यूवेळी माझीही स्थिती तुझ्यासारखीच होती, असे सांगून मला त्याने सांभाळले. नवाजचा विनम्रपणा मला प्रचंड भावला. हेच या चित्रपटाने मला दिले.