'गंगुबाई'च्या सुनावणीवेळी न्यायाधीशांनी सांगितली सत्य घटना अन् कोर्टरुममध्ये पसरली शांतता!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 06:15 PM2022-02-24T18:15:59+5:302022-02-24T18:16:37+5:30
'गंगुबाई काठियावाडी' चित्रपट आता २५ फेब्रवारी रोजी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटावर बंदी घालण्याच्या याचिकेवर सुनावणीवेळी न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी यांनी एका १४ वर्षीय मुलीची सत्य घटना कोर्टरुममध्ये कथन केली.
'गंगुबाई काठियावाडी' चित्रपट आता २५ फेब्रवारी रोजी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटावर बंदी घालण्याच्या याचिकेवर सुनावणीवेळी न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी यांनी एका १४ वर्षीय मुलीची सत्य घटना कोर्टरुममध्ये कथन केली. संपूर्ण घटना सांगताना खुद्द न्यायाधीश देखील भावूक झालेल्या पाहायला मिळाल्या होत्या. न्यायाधीश बॅनर्जी या अनेक वर्षांपासून लीगल एड सोसायटीच्या सदस्य राहिल्या आहेत. कोलकाता उच्च न्यायालयात न्यायाधीश असताना त्या लीगल सर्विसेस अथॉरिटीच्या चेअरमन देखील होत्या. याच दरम्यान त्यांच्यासमोर आलेल्या एका प्रसंगाची कहाणी कोर्ट रुममध्ये सांगितली.
"काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा मला एका देहव्यापारात ढकलल्या गेलेल्या एका महिलेबाबत समजलं. मी आजही त्या घटनेबाबत विचार करते तर मी दु:खी होते. ती १४ वर्षांची होती. कुटुंबात कुणीच नव्हतं. दोन वेळचं जेवणही मिळत नव्हतं. शेजारीच राहणाऱ्या एक मावशी तिचा सांभाळ करत होत्या. एकेदिवशी त्या मावशीनं तिला मुंबईत बोलावलं. इथं तुला नोकरी, जेवण आणि राहणं सारंकाही मिळेल असं सांगितलं. गरीबीतून मुक्तता होईल आणि हाताला काहीतरी काम मिळेल या आशेनं ती मुंबईत आली. पण तिच्या समोर एक मोठं संकट उभं होतं याची काहीच कल्पना तिला नव्हती. मावशीच्या जाळ्यात अडकल्यानंतर मुंबईत या १४ वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आले. एका रात्री तिच्यावर अनेकांनी बलात्कार केला. ती खूप ओरडली, रडली. पण तिथं तिची मदत करण्यासाठी कुणीच नव्हतं. एके दिवशी एका व्यक्तीला तिची दया आली आणि त्यानं तिला तिथून बाहेर काढत एका एनजीओकडे सोपवलं. त्या एनजीओनं पुढाकार घेतल्यामुळे माध्यमांसमोर हे प्रकरण आलं आणि त्याची खूप चर्चा त्यावेळी झाली", असं न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी म्हणाल्या.
त्या घटनेबाबत आजही विचार केला की अंगावर शहारे येतात, असं बॅनर्जी म्हणाल्या. एका रात्रीत नरकात दुष्कर्मी लोकांचा सामना केल्यानंतर ती मुलगी HIV पॉझिटीव्ह झाली होती. जेव्हा मी तिला भेटले तेव्हा तिनं माझा हात पकडला आणि मला विचारलं अखेरं असं मी काय चुकीचं केलं आहे? माझी चूक काय आहे? , हे सांगताना कोर्टरुममध्ये न्यायाधीश बॅनर्जी खूप भावूक झाल्या. त्यानंतर संपूर्ण कोर्टरुममध्ये स्मशान शांतता पसरली होती.
अखेर भन्साली प्रोडक्शनकडून गंगुबाई सिनेमाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी न्यायाधीश बॅनर्जींच्या भावनांचा मान राखून पुढील युक्तिवाद सुरू केला आणि त्यानंतर वातावरण निवळलं. "इथं प्रकरण वेगळं आहे. सिनेमात पीडित महिलेच्या हिमतीची प्रशंसा केली गेली आहे. सिनेमातून कोणत्याही पद्धतीची बदनामी करण्यात आलेली नाही. याउलट त्यांनी दाखवलेली हिंमत आणि आत्मविश्वासाचं दर्शन यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे", असं भन्साली प्रोडक्शनची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ अर्यमा सुंदरम म्हणाले.