काजोल सांगतेय, या विषयावर आमच्या घरात रंगतात गप्पा
By प्राजक्ता चिटणीस | Published: January 4, 2020 06:00 AM2020-01-04T06:00:00+5:302020-01-04T06:00:02+5:30
काजोलने तान्हाजी या चित्रपटाच्या निमित्ताने तिच्या खाजगी आयुष्यातील अनेक किस्से सांगितले.
काजोलने गेल्या अनेक वर्षांत एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. तान्हाजी या चित्रपटाच्या निमित्ताने ती पहिल्यांदाच एका ऐतिहासिक चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटात काम करण्याच्या तिच्या अनुभवाबाबत तिच्याशी मारलेल्या गप्पा...
तान्हाजी या चित्रपटातील सावित्रीबाईंच्या भूमिकेविषयी ऐकल्यानंतर तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती?
अजयने तान्हाजी या चित्रपटाची ज्यावेळी पटकथा ऐकली, त्यावेळी सावित्रीबाई ही भूमिका मीच चांगल्याप्रकारे साकारू शकते अशी त्याची खात्री पटली आणि त्याचमुळे त्याने मला या भूमिकेविषयी विचारले. पण अजयने मला सांगितल्यावर तुला नायिकेला पैसे द्यायचे नाहीत म्हणून मला या भूमिकेविषयी विचारतोस ना... अशी माझी पहिली प्रतिक्रिया होती. त्यावर तू चित्रपटाची पटकथा ऐक आणि निर्णय घे असे त्याने मला सांगितले. या चित्रपटाची पटकथा ऐकल्यावर मी या भूमिकेचे प्रेमात पडले. मी कधीच ऐतिहासिक चित्रपटामध्ये काम केलेले नाहीये. या चित्रपटात काम करण्याचा अनुभव खूपच वेगळा होता. या चित्रपटासाठी ओम राऊतने प्रचंड अभ्यास केला आहे. त्याने प्रत्येक गोष्टीचा बारकाव्याने अभ्यास केला असल्याने ही भूमिका साकारणे सोपे गेले. या चित्रपटातील वेशभुषा, रंगभूषा खूपच छान आहे. नऊवारी साडी घालण्याचा तर अनुभव खूपच वेगळा आणि छान होता.
स्वतःच्या प्रोडक्शन हाऊससोबत चित्रपट करण्याचे फायदे आणि तोटे काय असतात?
स्वतःच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करणे हे अतिशय सुखकर असते. मी कधीही चित्रीकरणाला वेळेत जाण्याचा प्रयत्न करते. पण कधी माझ्या मुलाच्या शाळेत जायचे असेल किंवा त्याला माझी गरज असेल तर मला चित्रीकरणाला जायला थोडासा उशीर व्हायचा. दुसरा कोणी निर्माता असेल तर मला उशीर होतोय हे सांगायला दडपण येते. पण मुलांच्याबाबतीतल्या गोष्टी असल्याने अजय समजून घ्यायचा, हा स्वतःच्या प्रोडक्शन हाऊससोबत काम करण्याचा फायदा असतो. तोटा म्हणजे कधीतरी अजय सांगायचा की, आज चित्रीकरणाला दोन तास अधिक थांबावे लागणार आहे. त्यावेळी स्वतःचेच प्रोडक्शन हाऊस असल्याने नकार देण्याचा प्रश्नच नसायचा.
गेल्या काही वर्षांत चित्रपटसृष्टी किती बदलली आहे असे तुला वाटते?
तांत्रिकदृष्ट्या आपण प्रचंड प्रगती केली आहे. आता डिजिटल कॅमेरे आले आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही अधिक स्पष्ट दिसते. प्रत्येक गोष्टीत अधिक सतर्क व्हावे लागते. तुमचा मेकअप जरी अधिक केला गेला असेल तरी ते कॅमेऱ्यावर लगेचच दिसून येते. तान्हाजी हा चित्रपट तर थ्री डी मध्ये शूट करण्यात आला आहे. थ्री डी मध्ये काम करणे खूपच वेगळे असते. कलाकाराला देखील त्याच तंत्रज्ञानाप्रमाणे अभिनय करावा लागतो.
तू आणि अजय दोघेही इंडस्ट्रीशी निगडित आहात. त्यामुळे घरी गेल्यानंतर देखील चित्रपटसृष्टीविषयीच गप्पा रंगतात का?
अजय आणि माझे दोघांचेही याबाबतीत मत सारखे आहे. तुम्ही घरात शिरताना काम बाहेर ठेवून यायचं. घरात चित्रपटसृष्टीविषयी न बोलता आम्ही आमच्या घरगुती गोष्टींविषयी बोलतो. एखाद्या सामान्य लोकांच्या घराप्रमाणेच आमच्या घरचे वातावरण असते.