कल्की कोचलिन केले 'या' मालिकेसाठी शूटिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 03:32 PM2018-09-12T15:32:11+5:302018-09-12T15:37:04+5:30
'माय इंडियन लाइफ' या आपल्या नव्या पॉडकास्ट मालिकेच्या एका 'लाइव्ह' भागाचे नुकतेच मुंबईमध्ये चित्रिकरण करण्यात आले. पॉडकास्टच्या नव्या भूमिकेमध्ये असलेली अभिनेत्री कल्की कोचलिन हिने या चित्रिकरणासाठी सेंट झेवियर्स कॉलेजला भेट दिली
'माय इंडियन लाइफ' या आपल्या नव्या पॉडकास्ट मालिकेच्या एका 'लाइव्ह' भागाचे नुकतेच मुंबईमध्ये चित्रिकरण करण्यात आले. पॉडकास्टच्या नव्या भूमिकेमध्ये असलेली अभिनेत्री कल्की कोचलिन हिने या चित्रिकरणासाठी सेंट झेवियर्स कॉलेजला भेट दिली आणि विद्यार्थी संवाद साधला. सध्या सुरू असलेल्या मालिकेच्या ऑक्टोबरमधील अखेरच्या भागादरम्यान या खास भागाच्या कार्यक्रमाचे प्रसारण केले जाणार आहे.
या पॉडकास्टमध्ये बाललैंगिक अत्याचारांविरोधात लढा देणा-या इन्सिया दारिवाला, जातव्यवस्थेमधील अन्यायाविरोधात लढा देणारे दलित कार्यकर्ते राहुल सोनपिंपळे आणि आइस हॉकीपटू दिस्कित अँग्मो हे तिघे या कार्यक्रमाच्या मंचावर कल्कीसोबत उपस्थित होते. ४ ऑगस्ट रोजी सुरू झालेला बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस पॉडकास्ट हा कार्यक्रम तरुणाईमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. बीबीसीने खास भारतीय प्रेक्षकांसाठी इंग्रजी भाषेत तयार केलेले हे पहिले पॉडकास्ट आहे.
माय इंडियन लाइफ ही मालिका संपूर्णपणे २१व्या शतकात जगणा-या भारतीय तरुणाईवर आधारित आहे. देशभरातील काही असामान्य व्यक्तींच्या ख-याखु-या गोष्टींचा शोध या पॉडकास्ट मालिकेतून घेतला जाणार आहे. यापैकी एका भागामध्ये एका महिलेने भारताच्या 'मार्स मिशन'मधील आपल्या सहभागाबद्दल कल्कीशी संवाद साधला आहे, तर आणखी एका भागामध्ये वाचादोष असूनही संगीतकार म्हणून यशस्वी होण्याचा प्रयत्न करत असलेल्या एका व्यक्तीची कहाणी सांगण्यात आली आहे. याशिवाय कौटुंबिक वाद, लैंगिक अत्याचार, छळ, जातीपातींमुळे होणारे अन्याय, एखाद्या गुन्ह्याचे बळी ठरलेल्यांच्या वाट्याला येणारी अवहेलना अर्थात व्हिक्टिम शेमिंग, स्वत:च्या बाह्यरूपाबद्दलचे गंड आणि लैंगिक शिक्षण या विषयांवरील कहाण्यांचाही समवेश या मालिकेमध्ये करण्यात आला आहे.