पूनम पांडेच्या निधनाबद्दल कळताच कंगना रणौतला बसला धक्का, म्हणाली, 'इतक्या तरुण मुलीला...'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 02:26 PM2024-02-02T14:26:36+5:302024-02-02T14:27:32+5:30
पूनम पांडेने कंगनाच्या 'लॉकअप' रिएलिटी शोमध्ये दिसली होती.
प्रसिद्ध मॉडेल, अभिनेत्री पूनम पांडेच्या (Poonam Pandey) निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. सर्व्हिकल कॅन्सरमुळे तिचे प्राण गेले. ही बातमी कळताच अनेकांना विश्वासच बसत नाहीए. कायम काही ना काही विवादांमुळे चर्चेत राहणारी पूनम पांडे आता या जगात नाही हेच सत्य आहे. पूनमच्या निधनाची बातमी कळताच बॉलिवूडची 'क्वीन' कंगना रणौतही (Kangana Ranaut) शॉक झाली आहे. तिने पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.
आज सकाळीच पूनम पांडेच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंवर पोस्ट शेअर करण्यात आली. यामध्ये तिच्या टीमने लिहिलं की, "ही सकाळ आमच्या सगळ्यांसाठीच कठीण आहे. आम्हाला हे सांगताना अत्यंत दु:ख होत आहे की सर्व्हिकल कॅन्सरमुळे पूनमने जगाचा निरोप घेतला आहे. ती कायम सगळ्यांसोबत प्रेमाने राहिली. या दु:खद समयी आम्हाला प्रायव्हसी द्यावी ही विनंती. पूनम कायमच स्मरणात राहील." पूनमच्या मॅनेजरने या बातमीला दुजोराही दिला आहे.
ही पोस्ट वेगाने व्हायरल झाली आणि पूनमच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. कंगना रणौतने बातमी शेअर करत लिहिले, "हे खूपच दु:खद आहे. इतक्या तरुण मुलीला कॅन्सर असणं हे किती दुर्भाग्यपूर्ण आहे. ओम शांती."
कंगना रणौतचा रिअॅलिटी शो 'लॉकअप' च्या सीझन 1 मध्ये पूनम पांडे सहभागी झाली होती. तिथेच कंगना आणि तिची ओळख झाली. या शोमध्येही पूनम बोल्डनेसमुळे चर्चेत आली होती. 'नशा' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. याशिवाय 'खतरो के खिलाडी' मध्येही ती सहभागी झाली होती.