कंगना राणौत दोनवेळची डिफॉल्टर, लाईट बिल १ लाख कसे आले?; हिमाचलच्या वीज मंडळाने हिस्ट्रीच काढली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 19:45 IST2025-04-10T19:42:19+5:302025-04-10T19:45:32+5:30
Kangana Ranaut Electricity Bill Row: कंगनाचे मनाली येथे घर आहे. तिला आलेल्या वीज बिलाचा आकडा पाहून तिला धक्का बसल्याचे तिने दाखविले होते. परंतू, हिमाचल प्रदेश राज्य विद्युत मंडळाने सांगितलेली वस्तुस्थिती वेगळी आहे.

कंगना राणौत दोनवेळची डिफॉल्टर, लाईट बिल १ लाख कसे आले?; हिमाचलच्या वीज मंडळाने हिस्ट्रीच काढली...
प्रसिद्ध अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना राणौत हिला हिमाचल प्रदेश वीज कंपनीने एक लाख रुपयांचे लाईट बिल पाठविले आहे. यावरून तिने हिमाचल प्रदेश राज्य सरकारवर टीका केली होती. आता यावर कंगनाची हिस्ट्री सांगणारा खुलासा आला आहे.
कंगनाचे मनाली येथे घर आहे. तिला आलेल्या वीज बिलाचा आकडा पाहून तिला धक्का बसल्याचे तिने दाखविले होते. परंतू, हिमाचल प्रदेश राज्य विद्युत मंडळाने सांगितलेली वस्तुस्थिती वेगळी आहे. कंगना राणौतने दोन वेळा वीज बिल वेळेवर भरलेले नाही. तसेच ती नियमितपणे सरकारच्या वीज अनुदानाचा लाभ घेत असल्याचे म्हटले आहे.
मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप कुमार यांनी ही माहिती दिली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. यावरून तिने एका सभेत या सरकारवर टीका केली होती. "या महिन्यात माझ्या मनालीतील घराचं विजेचं बिल १ लाख रुपये आलं. जेव्हा की मी तर तिथे राहतही नाही. इतरी दुर्दशा झाली आहे. आपण हे पाहत राहतो आणि आपल्यालाच लाज वाटते की हे नक्की चाललंय तरी काय? पण आपल्याकडे एक संधी आहे. तुम्ही सगळे माझे बंधू भगिनी आहात, तुम्ही ग्राऊंडवर अतिशय कष्टाने काम करत आहात. आपल्या सर्वांचंच हे दायित्व आहे की आपण या देशाला, या प्रदेशाला विकासाच्या मार्गावर घेऊन जावं. मी तर म्हणते हे लोक लांडगे आहेत आणि आपल्याला आपल्या प्रदेशाला त्यांच्या तावडीतून सोडवायचं आहे.", असे ती म्हणाली होती.
यावर मंडळाने खुलासा करताना म्हटले की, मनाली वीज उपविभागाअंतर्गत येणाऱ्या सिमशा गावात कंगना राणौतचे घर आहे, त्याला घरगुती वीज कनेक्शन नोंदणीकृत आहे. घराचे ९०,३८४ रुपयांचे वीज बिल हे जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांच्या वीज वापराशी संबंधित आहे. तसेच हे बिल २८ मार्च रोजी विलंब शुल्कासह भरण्यात आले आहे. वीज बिलात मागील ३२,२८७ रुपयांची थकबाकी देखील समाविष्ट आहे. म्हणजेच जुनी बिले भरलेली नाहीत. त्यामुळे या प्रलंबित देयकासह ९०,३८४ रुपये बिल पाठविण्यात आले होते.
कंगना राणौतच्या घरातील कनेक्टेड लोड ९४.८२ किलोवॅट आहे, जो सामान्य घरापेक्षा १५००% जास्त आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या काळातील विज बिल भरलेले नव्हते. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे बिलही विलंबाने भरले होते, असे मंडळाने म्हटले आहे. कंगनाच्या घरात 6,000 यूनिट, ९००० युनिट अशी वीज वापरण्यात आली आहे. कंगना राणौत सतत तिचे मासिक वीज बिल विलंबाने भरत आली आहे. अनेक लोकांनी स्वेच्छेने सोडून दिलेली राज्य सरकारची सबसिडीचा लाभ कंगना आजही घेत आहे, असे ते म्हणाले. फेब्रुवारीत तिला ७०० रुपयांची सबसिडी मिळालेली आहे, असे मंडळाने जाहीर केले. आजतकने याची बातमी दिली आहे.