"स्त्री यशस्वी असेल तर तिचा तिरस्कार.."; अन्नू कपूर यांच्या 'त्या' विधानावर कंगनाने साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 09:01 AM2024-06-22T09:01:38+5:302024-06-22T09:01:56+5:30
अन्नू कपूर यांनी कंगना रणौतवर नुकतंच एक विधान केलं होतं. अखेर कंगनाने या विधानाला चांगलंच प्रत्युत्तर दिलंय (annu kapoor, kangana ranaut)
काल एक मुद्दा मनोरंजन विश्वात चर्चेत होता. तो म्हणजे अन्नू कपूर यांनी कंगना रणौतवर केलेली अप्रत्यक्ष टीका. 'हमारे बारह' या सिनेमाच्या प्रेस कॉन्फरन्स दरम्यान अन्नू कपूर यांना कंगनाला जी मारहाण झाली त्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी अन्नू यांनी 'कंगनाला ओळखत नाही. कोण आहे ती?' असा प्रतिप्रश्न मीडियाला केला. याविषयी कंगना रणौतच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर कंगनाने सोशल मीडियावर याविषयी मौन सोडलंय.
कंगना रणौत अन्नू कपूर यांच्या विधानावर काय म्हणाली?
दरम्यान कंगनाने सोशल मीडियावर अन्नू कपूर यांचा प्रेस कॉन्फरन्स दरम्यानचा फोटो पोस्ट केलाय. त्याखाली कॅप्शन लिहित कंगनाने अन्नू यांच्यावर निशाणा साधलाय. कंगना लिहिते,"तुम्ही अन्नू कपूरजी यांच्याशी सहमत आहात का? आम्ही यशस्वी स्त्रीचा तिरस्कार करतो. एखादी स्त्री सुंदर असेल तर तिचा जास्त तिरस्कार करतो. याशिवाय ती शक्तिशाली असेल तर तिचा अधिक प्रभावीपणे तिरस्कार करतो? हे खरंय का?" कंगनाने दिलेलं हे प्रत्युत्तर सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे.
अन्नू कपूर कंगनाबद्दल काय म्हणाले होते?
'हमारे बारह' सिनेमाच्या पत्रकार परिषदेवेळी अन्नू कपूर यांना कंगना रणौतसोबत झालेल्या थप्पड प्रकरणावर बोलतं करण्यात आलं. त्यावेळी अन्नू कपूर म्हणाले, "ही कंगना रणौत कोण आहे? कोणी मोठी अभिनेत्री आहे का? सुंदर आहे का?" अन्नू कपूर पुढे म्हणाले, "जर मी असं काही विधान केलं असतं तर माझं म्हणणं हे बेकार आहे, हे मी सुरुवातीलाच सांगतो. यानंतर जर कोणी मला कानफडात मारली तर मी कायदेशीर मार्गाने जाईल." अशी प्रतिक्रिया अन्नू कपूर यांनी दिली. कंगनाने प्रचारसभेत शेतकरी आंदोलनावर केलेल्या विधानाच्या निषेधार्थ तिला चंदीगढ एअरपोर्टवर CISF जवान महिलेने कानफडात मारली होती.