"संपूर्ण फिल्म इंडस्ट्री नकली...", कंगना राणौतने केली इंडस्ट्रीची पोलखोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 11:53 AM2024-05-21T11:53:36+5:302024-05-21T12:54:24+5:30
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं बॉलिवूडची पोलखोल केली.
बॉलिवूडची क्वीन अशी ओळख असलेली अभिनेत्री म्हणजे कंगना राणौत. बॉलिवूडनंतर आता राजकारणात आपलं नशीब आजमावत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मंडी लोकसभा मतदारसंघातून ती मैदानात उतरली आहे. तिकिट मिळाल्यापासून कंगना विविध कारणांमुळे सतत चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं बॉलिवूडची पोलखोल केली.
कंगना राणौतने अलीकडेच आजतकला मुलाखत दिली. यावेळी तिला निवडणूक जिंकली तर बॉलिवूड आणि राजकारणाचा समतोल कसा साधणार, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर कंगना म्हणाली, 'मला एका वेळी एकच काम करायला आवडेल. पण, त्याआधी मी अपुर्ण राहिलेली सर्व कामे पूर्ण करेल'. यासोबतच कंगनाला विचारण्यात आले की ती मंडीतून निवडून आल्यास बॉलिवूड सोडणार का? यावर अभिनेत्रीने हो असे उत्तर दिलं.
चित्रपट आणि सार्वजनिक सेवा यातील विषमतेबद्दल कंगना म्हणाली, 'फिल्म इंडस्ट्री नकली आहे. तिथं वेगळं वातावरण निर्माण केलं जातं. सर्व काही बनावटी आहे. ते एक चकचकीत जग आहे'. तर राजकारणावर कंगना म्हणते, 'मला लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. स्व:ताला पूर्ण झोकून देऊन काम करायचे आहे'.
कंगना राणौतच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर ती आगामी 'इमर्जन्सी' या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची कथा आणीबाणीवर आधारित आहे. सध्या अभिनेत्री प्रचारात व्यस्त असल्याने सिनेमाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. आता तो सिनेमा निवडणुकीनंतरच प्रदर्शित होणार आहे. याआधी कंगना 'तेजस'सिनेमामध्ये दिसली होती, जो थिएटरमध्ये फ्लॉप आणि ओटीटीवर हिट ठरला.