'हा अफगाणिस्तान नाहीये...'; Kangana Ranaut चा नुपूर शर्माला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 04:23 PM2022-06-08T16:23:23+5:302022-06-08T16:23:29+5:30
Kangana ranaut: कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने नुपूर शर्माला पाठिंबा दिला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर उघडपणे व्यक्त होत असते. त्यामुळे बऱ्याचदा ती तिच्या चित्रपटांपेक्षा वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येते. कंगना अनेकदा सामाजिक, राजकीय मुद्द्यांवर व्यक्त होताना दिसते. यात अलिकडेच तिने नुपूर शर्मा प्रकरणावर भाष्य केलं आहे. नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे सध्या त्या अडचणीत आल्या आहे. अनेक जण या मुद्द्यावर आपल मत मांडत असतानाच कंगनाने आता नुपूर यांना पाठिंबा दिला आहे.
कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने नुपूर शर्माला पाठिंबा दिला आहे. “नुपूरला त्यांचं मत मांडायचा पूर्ण अधिकार, स्वातंत्र्य आहे. त्यांना ज्या पद्धतीने धमक्या दिल्या जातायेत त्या मी पाहिल्या आहे. जेव्हा दररोज हिंदू देवतांना अपमानित केलं जातं तेव्हा आपण न्यायालयात न्याय मागतो. मग निदान आता तरी असं करू नका. हे काही अफगाणिस्तान नाही. आपला देश एक संपूर्ण व्यवस्था असलेल्या सरकारकडून चालवला जात आहे. जे सरकार आपण लोकांनी निवडून दिलं आहे. त्याला लोकशाही असं म्हटलं जातं. हे फक्त त्या लोकांना सांगतीये जे नेहमी ही गोष्ट विसरतात, असं कंगनाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर जगभरातील अनेक देशांनी यावर आक्षेप घेतला. नुपूर यांना होत असलेला विरोध पाहता भाजपनेही त्यांना निलंबित केलं. या मुद्द्यावरून इस्लामिक देशांच्या संघटनेपासून ते कतार, कुवेत, इराण आणि पाकिस्तानने नाराजी व्यक्त केली आहे. तसंच भारताच्या आसपास, इस्लामिक सहकार्य संघटनेने (ओआयसी) भारताला घेरत संयुक्त राष्ट्र आणि मानवाधिकार संघटनांना भारतातील मुस्लिमांना लक्ष्य करण्याच्या विरोधात आवश्यक पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. ओआयसीच्या वतीने भारतात मुस्लिमांविरोधातील हिंसाचारात वाढ झाल्याचे सांगण्यात आले.