एवढाच त्रास होत असेल तर कंगनाने इंडस्ट्री सोडावी - करण जोहर
By Admin | Published: March 7, 2017 10:12 AM2017-03-07T10:12:33+5:302017-03-07T10:26:02+5:30
घराणेशाहीच्या मुद्यावरून करण जोहरवर टीका करणा-या कंगना राणौतवर करणने टीका करत त्रास होत असल्यास इंडस्ट्री सोडण्याचा सल्ला दिला.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - ' कॉफी विथ करण'मध्ये येऊन करणलाच घराणेशाहीबद्दल चार शब्द सुनावणा-या कंगना राणौतचे नेटीझन्सनी खूप कौतुक केले होते. तिच्या स्पष्ट, पारदर्शक स्वभावामुळे आणि मनात येईल ते बोलण्याच्या वृत्तीमुळे कंगनाने आत्तापर्यंत अनेक शत्रू बनवले आहेत, मात्र असं असलं तरीही कंगनाने आपला स्वभाव बदललेला नाही. जे खरं असेल ते आणि मनात असेल तेच ती बोलते. मात्र तिचा हा बेधडक स्वभाव अनेकांना पटत नाही. दिग्दर्शक करण जोहरलाही कंगनाच्या बेधडक उत्तरांमुळे आणि आपल्यावरील आरोपांमुळे धक्का बसला होता. अनुपमा चोप्रा यांच्याशी बोलताना करणने अखेर याप्रश्नी मौन सोडत कंगनावर टीका केली आहे.
कंगनाच्या (शोमधील) वक्तव्यात कोणताही बदल न करण्याइतका वा ते कट न करण्याइतकं मोठं मन माझ्याकड आहे. तिचं मत मांडण्यासाठी मी तिला मंच उपलब्ध करून दिला आणि आता या मंचावरून मी माझं मत मांडत आहे. प्रत्येकवेळी स्वतःचा बळी गेल्याचे दाखवण्याच्या कंगनाच्या स्वभावाची आता सवय झाली आहे. या इंडस्ट्रीमुळे तिला जर एवढाच त्रास होत असेल, अडचणी येत असतील तर तिने ही इंडस्ट्री सोडावी' असे करणने म्हटले. तसेच कंगनाच्या घराणेशाहीच्या आरोपालाही त्याने सडेतोड उत्तर दिले. ' मी आत्तापर्यंत माझ्या कुटुंबातील कोणालाही चित्रपटसृष्टीत ब्रेक वगैरे दिलेला नाही. त्यामुळे माझ्यावर ' नेपोटिझम'चा आरोप करणा-या कंगनाला त्या शब्दाचा खरा अर्थ माहीत नसावा' असेही करणने म्हटले.
काय म्हणाली होती कंगना?
'कॉफी विथ करण'मध्ये 'रंगून'च्या प्रमोशनसाठी सैफ अली खानसोबत आलेल्या कंगनाने बेधडक उत्तरे दिली होती. रॅपिड फायर राऊंडमध्ये तिने करण जोरवरही निशाणा साधला होता. कंगनाच्या म्हणण्यानुसार 'जेव्हा कधी तिच्या जीवनावर चित्रट बनेल वा आत्मचरित्र लिहील, त्यावेळी त्यामध्ये घराणेशाहीच्या मुद्द्याला अनुसरुन काही भाग असेल आणि तो भाग करण जोहरनेच लिहिलेला असेल' तिच्या वक्तव्याने करणही तेव्हा अवाक झाला होता.