कनिका - काही अनाकलनीय धक्क्यांची भुतावळ..!
By Admin | Published: April 1, 2017 11:27 PM2017-04-01T23:27:38+5:302017-04-01T23:27:38+5:30
भयपटात अचानक येणारे धक्के महत्त्वाची भूमिका बजावतात आणि या धक्क्यांनी अनेकदा दचकायला होते. ‘कनिका’ या चित्रपटातही असे धक्के जरूर आहेत
मराठी चित्रपट ‘कनिका’ - राज चिंचणकर
भयपटात अचानक येणारे धक्के महत्त्वाची भूमिका बजावतात आणि या धक्क्यांनी अनेकदा दचकायला होते. ‘कनिका’ या चित्रपटातही असे धक्के जरूर आहेत; परंतु हा चित्रपट उत्तरार्धात निष्कारण वाहवत जाण्याचा जो धक्का देतो, तो या कथेला मारक ठरला आहे. परिणामी, चित्रपटाच्या मानगुटीवर नको ते भूत विराजमान झाल्याचे पाहावे लागते. पण एक भयपट म्हणून जे जे काही हवे, ते ते यात ठासून भरले आहे.
ही कथा ज्यांच्याभोवती फिरते ते नामवंत डॉक्टर आहेत. त्यामुळे त्यांना ज्या अनाकलनीय गोष्टींचा अनुभव येतो; त्यावर सहज विश्वास ठेवता येणारच नाही याची तजवीज कथा, पटकथा, संवादलेखक व दिग्दर्शक पुष्कर मनोहर यांनी आधीच करून ठेवली आहे. चित्रपट सुरू झाल्यावर जे काही अनुभवायला मिळते, त्यावरून खुर्ची घट्ट पकडून ठेवावी लागणार याचे सूचन होत जाते. मात्र हे बांधलेपण मध्यांतरानंतर ढिले पडते आणि पटकथेत झालेली गडबड स्पष्ट जाणवायला लागते. चित्रपट शेवटाकडे येताना त्यातले भयसुद्धा नाहीसे झालेले असते. लेखनापेक्षा दिग्दर्शक या नात्याने मात्र पुष्कर मनोहर यांनी उजवी कामगिरी केली आहे. कथेला आवश्यक असलेला थरार त्यांनी चांगला निर्माण केला आहे. काही प्रसंग नक्कीच उठावदार झाले आहेत. अर्थात, यात छायाचित्रण आणि पार्श्वध्वनीचा मोठा हातभार आहे. चंद्रशेखर नगरकर यांचा कॅमेरा मस्त फिरला आहे; तर अमेय नरे व साजन पटेल यांचा बॅकग्राउंड स्कोर जमून आला आहे. श्रीकांत जाधव यांच्या व्हीएफएक्स तंत्राचा खेळ उत्तम आहे. चित्रपट ‘हॉरर’ आहे म्हटल्यावर, त्यात अनाकलनीय गोष्टींची भुतावळ असणारच यात काही वादच नाही. या चित्रपटाच्या सुरुवातीला असे काही धक्के बसत राहतात, की त्या वातावरणनिर्मितीने दचकायला होते. पण एकदा का ‘त्या’ कथित भुतावळीचे दर्शन झाले की मग एक सरावलेपण येत जाते आणि त्या धक्क्यांचा परिणामही मंदावतो. मात्र या चित्रपटाने हा थरार मध्यांतरानंतरसुद्धा काही खास प्रसंग योजत कायम ठेवला आहे. परंतु, उत्तरार्धात पटकथा आणि संवादांत उडालेला गोंधळ, यामुळे एकूणच चित्रपटाची पातळी घसरते. सुशिक्षित डॉक्टरने स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी तद्दन पुरुषी मानसिकतेतून स्त्रीभ्रूणहत्येसाठी स्त्रियांना जबाबदार धरणे, हा तर हास्यास्पद प्रकार वाटतो. या कथेत डॉक्टरच्या सहकाऱ्यांचे होणारे मृत्यू त्याला ज्या विलंबाने कळतात, हे पचनी पडणारे नाही. ज्या मुलीचे भूत चित्रपटात दाखवले आहे, ती नक्की कोण, हा प्रश्न त्याचे ‘स्पष्टीकरण मिळूनही’ अधांतरी राहतो. तसेच, या कथेतून एका सामाजिक प्रश्नाला हात घातल्याचे सूचित होत असले, तरी त्या बांधिलकीचा हात आखडता घेतल्याचेही स्पष्ट होते. चित्रपटातल्या डॉक्टर कौशिक यांच्या रूपाने शरद पोंक्षे यांच्या वाट्याला आलेली ही चाकोरीबाहेरची भूमिका आहे आणि त्यात वेगळेच शरद पोंक्षे पाहायला मिळतात. त्यांच्या पत्नीच्या, वैशालीच्या भूमिकेत चैत्राली गुप्ते यांनी नैसर्गिक अभिनय केला आहे. स्मिता शेवाळे, फाल्गुनी रजनी, आनंदा कार्येकर, कमलाकर सातपुते, नीलेश बेहेरे, वंदना मराठे आदी कलाकारांची साथ ठीक आहे. बाकी, मराठीत बऱ्याच काळानंतर आलेल्या भयपटाचा अनुभव घेण्यासाठी मात्र ‘कनिका’ची ही भुतावळ पाहायला हवी.