‘कन्यारत्न’ आदितीचा स्त्री-अस्तित्वाचा झगडा
By Admin | Published: February 1, 2016 01:54 AM2016-02-01T01:54:26+5:302016-02-01T01:54:26+5:30
स्त्रीभ्रूणहत्या, बलात्कार, लैंगिक शोषण, महिलांची सुरक्षा असे अनेक प्रश्न सध्या देशासमोर आहेत. त्यासाठी कडक कायदे, त्यांची अंमलबजावणी, विविध संस्थांमार्फत प्रयत्नही केले जात आहेत
स्त्रीभ्रूणहत्या, बलात्कार, लैंगिक शोषण, महिलांची सुरक्षा असे अनेक प्रश्न सध्या देशासमोर आहेत. त्यासाठी कडक कायदे, त्यांची अंमलबजावणी, विविध संस्थांमार्फत प्रयत्नही केले जात आहेत. पण अनेक गावांमध्ये आजही ही परिस्थिती कायम आहे आणि ती अधिकाधिक गंभीर बनत चालली आहे. अशाच एका विषयावर दिग्दर्शक शिवाजी ढोलताडे ‘कन्यारत्न’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी आणि अनेक मालिकांमध्ये दमदार अभिनय करून आपली छाप पाडलेली अभिनेत्री आदिती सारंगधर तिच्या भूमिकेविषयी सांगते, की गावातील एक पडेल ते काम करणारी महिला आणि तिचा अपंग नवरा हे दोघे मिळून रस्त्यावर टाकलेल्या मुलीचा सांभाळ करतात. मात्र शाळेत शिकत असताना तिचा मृत्यू होतो. पण तिने केलेल्या एका प्रोजेक्टसाठी तिचा सत्कार करताना मात्र तिचे खरे आई-वडील तो सन्मान स्वीकारायचा ठरवतात. त्या वेळी याच्याविरोधात लढा देताना पाहायला मिळणार आहे. आदिती असेही सांगते, की हा अत्यंत वेगळ्या विषयावरील चित्रपट आहे. यापूर्वी मी कधीच इतकी निराळी भूमिका साकारलेली नाही.
या माध्यमातून समाजामधील मुलींबद्दलची सामाजिक मानसिकता बदलण्याचा आणि आस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात आदिती सारंगधरसमवेत सुरेखा कुडची, तेजा देवकर, अभिनेते मिलिंद शिंदे, रोहन दोलताडे आणि बालकलाकार समृद्धी, कार्तिक, हर्षदा, कोमल महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. चित्रपटाची निर्मिती विश्वास गोवर्धन दोलताडे करीत आहेत.