कपिल देव यांच्या मनाला भिडला 'चंदू चॅम्पियन', सिनेमा पाहताना अश्रू अनावर; म्हणाले - 'ही फक्त स्पोर्ट्स फिल्म नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 11:09 AM2024-06-19T11:09:57+5:302024-06-19T11:10:39+5:30
चंदू चॅम्पियन पाहून कपिल देव भावुक
Chandu Champion : काही सिनेमे असे असतात की ते पाहिल्यानंतर मनात घर करून जातात. तर काही सिनेमे पाहिल्यानंतर ते हृदयाला स्पर्श करून जातात. असे सिनेमे पाहताना आपलेही डोळे ही पाणवतात. अशाच धाटणीचा 'चंदू चॅम्पियन' हा सिनेमा १४ जून रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमात भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर (Murlikant Petkar) यांच्या आयुष्यावर हा चित्रपट बेतला आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांना आपल्या भावना आवरणं कठीण झालं आणि त्यांना अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं.
कपिल देव यांनी 'चंदू चॅम्पियन' सिनेमा पाहिला. या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन याने (Kartik Aaryan) मुरलीकांत यांची भूमिका साकारली आहे. सिनेमात कार्तिकचा अभिनय पाहून कपिल देव भावूक झाले. कार्तिक आणि दिग्दर्शक कबीर खान यांचं त्यांनी भरभरुन कौतुक केलं. कपिल देव यांनी सोशल मीडियावर थेट एक पोस्ट शेअर केली आहे.
कपिल देव यांनी लिहलं, 'चंदू चॅम्पियन! निश्चितपणे असा एक सिनेमा जो अजिबात चुकवायला नको. मला स्पोर्ट्स फिल्म पाहायला आवडतात आणि मी त्यांचं कौतुक वाटतं. पण, 'चंदू चॅम्पियन' ही केवळ स्पोर्ट्स फिल्म नाही. त्यापेक्षाही खूप काही आहे. सिनेमा पाहून मी हसलो, रडलो, अभिमान वाटला आणि मग आणखी रडलो. कबीर खानला सलाम. त्याने पुन्हा एकदा चमत्कार करुन दाखवला. आणखी एक चांगला चित्रपट बनवला. कार्तिक आर्यनने अप्रतिम अभिनय केला आहे. मेहनत आणि प्रतिभा स्पष्टपणे चमकत आहे. सगळे कलाकार आणि क्रूचे खूप अभिनंदन आणि आम्हाला हा चित्रपट दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही सर्व चॅम्पियन आहात!'.
'चंदू चॅम्पियन' हा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. 1965 च्या युद्धात जखमी झाल्याने मुरलीकांत पेटकर यांना अपंगत्व येते. मात्र, आपल्या जिद्दीच्या बळावर पेटकर यांनी लहानपणापासून उराशी बाळगलेले ऑलिम्पिक पदक विजयाचे स्वप्न पॅराऑलिम्पिकमध्ये पूर्ण करतात. कार्तिक आर्यनने मुरलीकांत पेटकर यांची भूमिका साकारली आहे. कबीर खानने हा सिनेमा दिग्दर्शित केला. तर साजिद नाडियादवाला आणि कबीर खान यांनी संयुक्तपणे सिनेमाची निर्मित केली आहे.