'रॉकी और रानी'चा रोमान्स, ७ वर्षांनंतर करण जोहर घेऊन आलाय अनोखी 'प्रेम कहानी'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 02:37 PM2023-06-20T14:37:24+5:302023-06-20T14:38:28+5:30
रोमान्स, फॅमिली ड्रामाने भरलेल्या या सिनेमातील स्टारकास्टही तगडी आहे.
'फॅमिली ड्रामा'साठी प्रसिद्ध असलेला दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) आणखी एक प्रेम कहानी घेऊन आलाय. ऐ दिल है मुश्कील सिनेमानंतर सात वर्षांनी करण जोहरने पुन्हा दिग्दर्शनाची धुरा सांभाळली. आलिया भट (Alia Bhat) आणि रणवीर सिंहचा (Ranveer Singh) 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून यामध्ये 'धर्मा फॅक्टर' दिसून येतोय.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चा १ मिनिट १९ सेकंदांचा टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझर पाहून शाहरुख काजोलच्या केमिस्ट्रीची आठवण येते. रोमान्स, फॅमिली ड्रामाने भरलेल्या या सिनेमातील स्टारकास्टही तगडी आहे. रणवीर सिंह, आलिया भटसह धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आजमी यांचीही मुख्य भूमिका आहे. यश चोप्रा स्टाईल बर्फाळ ठिकाणी आलिया साडीत दिसत आहे तर रणवीर आलियाचा रोमान्सही पाहायला मिळत आहे. मॉं दुर्गाची भव्य पूजा असल्याचा एक सीन आहे त्यावरुन स्पष्ट होतंय की आलिया भट बंगाली कुटुंबातील आहे. तर दुसरीकडे फॅमिली ड्रामाही दाखवण्यात आला आहे. 'तुम क्या मिले' या गाण्याची झलकही टीझरमध्ये दिसते.
किंग खानच्या हस्ते टीझर लॉंच
शाहरुख आणि करण जोहरची मैत्री तर सर्वश्रुत आहे. शाहरुख खाननेही मित्र करण जोहरच्या या सिनेमाचे टीझर लॉंच करत खास पोस्ट शेअर केली आहे. तो लिहितो,'वाह करण, फिल्ममेकर म्हणून तुला २५ वर्षं पूर्ण झाली. खूप मोठा प्रवास आहे. तुझे वडील आणि माझे मित्र टॉम अंकल वरुन तुझं हे यश बघून आनंदाने नाचत असतील आणि तुझ्यावर गर्व करत असतील. मी किती वेळा सांगितलं आहे की तू जास्तीत जास्त सिनेमे बनव, लोकांच्या जीवनात प्रेमाची भावना निर्माण कर ज्यासाठी तुला लोक ओळखतात. रॉकी और रानी चा टीझर खूप सुंदर आहे. संपूर्ण कास्टला माझ्या खूप शुभेच्छा.'
बऱ्याच वर्षांनी धर्मेंद्र आणि जया बच्चन यांचं पुनरागमन
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमात सीनिअर स्टारकास्टही लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. बऱ्याच काळानंतर धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आजमी सारखे दिग्गज कलाकार एकाच सिनेमात बघायला मिळत आहेत हे विशेष. त्यांना एकत्र सिनेमात बघणं प्रेक्षकांसाठी खास ट्रीट असणार आहे.