"फक्त ३० टक्के वाचण्याची शक्यता होती", पूनम पांडेच्या निधनानंतर सोनाली बेंद्रेचा 'तो' व्हिडिओ करण जोहरने केला शेअर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 11:06 AM2024-02-03T11:06:55+5:302024-02-03T11:07:18+5:30
Poonam Pandey Death : "जेव्हा मी उपचारासाठी गेले, तेव्हा...", सोनाली बेंद्रेचा व्हिडिओ शेअर करत करण जोहरची पोस्ट
मॉडेल पूनम पांडेचं ३२व्या वर्षी सर्व्हायकल कॅन्सरने निधन झाल्याची बातमी २ फेब्रुवारीला समोर आली. पूनम पांडेच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिच्या निधनाबाबत पोस्ट शेअर करण्यात आली होती. तिच्या अचानक निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला. पण तिच्या निधनाबाबत अजूनही शंका व्यक्त केल्या जात आहेत. पूनम पांडेला कॅन्सरने हरवलं पण, असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी कॅन्सरवर मात करत पुन्हा नव्याने आयुष्य जगायला सुरुवात केली. यापैकीच एक म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे.सोनाली बेंद्रेला २०१८ मध्ये मेटास्टॅटिक कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यानंतर तिने उपचार घेत कर्करोगावर मात केली.
आता पूनम पांडेच्या निधनानंतर बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरने सोनाली बेंद्रेसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने सोनालीचा मुलाखतीतील एक व्हिडिओ शेअर केला आहे. "माझ्या ओळखीतल्या मजबूत स्त्रियांपैकी तू एक आहेस," असं करणने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
या व्हिडिओत ती म्हणते, "जेव्हा मी उपचारासाठी गेले. तेव्हा मला डॉक्टर म्हणाले की तुला स्टेज ४चा कॅन्सर आहे. फक्त ३० टक्के वाचण्याची शक्यता आहे. आणि जेव्हा उपचार संपले तेव्हा मी स्मार्टवॉचमध्ये पाहिलं. मी १० किमी चालले होते. तेव्हा मी त्यांना म्हणाले तुम्हाला माहितीये का...जर मी हे करू शकते तर मी यातून नक्कीच वाचू शकते. सुजलेला चेहरा, डाग, टक्कल पडलेलं...आणि जेव्हा केस परत यायला लागले तेव्हा तो डोक्याचा सर्वात कुरुप भाग वाटत होता."
"मीच का? असं आयुष्यातील कोणत्याही प्रसंगात आपण म्हणतो. पण आपण का नाही? मग कोण? प्रत्येक जण आपल्या आयुष्यात अनेक गोष्टींचा सामना करत असतो. तुम्हाला ते माहीत नाही याचा अर्थ त्यांच्या आयुष्यात स्ट्रगल नाही असं नाही. पृथ्वीतलावरील प्रत्येक माणसाचा स्वत:चा वेगळा स्ट्रगल आहे. तुम्हाला तो स्ट्रगल वाटत नसेल. पण, त्यांच्यासाठी तो स्ट्रगल आहे. त्यामुळे मी कधीच मीच का? असं म्हणत नाही," असंही सोनाली पुढे म्हणते.