कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 01:27 PM2024-11-20T13:27:26+5:302024-11-20T13:27:52+5:30
नवऱ्याबद्दल म्हणाली, "तो शूटसोडून येणार होता पण मीच थांबवलं कारण..."
अभिनेत्री आणि कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मिरा शाहचा (Kashmera Shah) दोन दिवसांपूर्वी भयानक अपघात झाला. लॉस एंजिलिस येथे एका मॉलमध्ये फिरत असताना ती काचेवर धडकली. तिच्या नाकाला जबर मारला आणि तीव्र रक्तस्त्रावही झाला अशी माहिती तिची नणंद आरती सिंहने दिली होती. आता कश्मिराने स्वत: सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत हेल्थ अपडेट दिली आहे.
कश्मिरा शाहने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिच्यासोबत लॉस एंजिलिस येथील डॉ अनिल मोहीन आहेत. ती लिहिते, "सोशल मीडिया फॅमिली आणि माझ्या सर्व मित्रपरिवाराचे आभार. तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना केली, काळजी दाखवली यासाठी मी कायम तुमची ऋणी आहे. मी काचेला जाऊन धडकले ज्यामुळे कदाचित माझा संपूर्ण चेहरा विद्रुप झाला असता. पण सुदैवाने फक्त नाकाला जखम झाली. पण याचा माझ्यावर मानसिकरित्या परिणाम झाला कारण मी घरापासून आणि कुटुंबापासून इतकी लांब होते. मी लॉस एजिलिसमध्ये आहे आणि उद्या हे बँडेज काढण्यात येईल. नाकाला जी जखम झाली आहे त्याचं व्रण कायम राहील जे मला आयुष्य किती छोटं आहे याची जाणीव करुन देत राहील.आपण रोज देवाने दिलेल्या आयुष्यासाठी त्याचे आभार मानायला हवे."
ती पुढे लिहिते,"पुन्हा एकदा मी तुम्ही सर्वांचे आभार मानते आणि मी सगळ्यांना रिप्लाय देऊ शकले नाही यासाठी माफ करा. मला खूप वेदना होत होत्या आणि अजूनही होत आहेत पण मी आनंदी आहे. मी लवकरच भारतात परत येत आहे आणि ही वेळही निघून जाईल. विशेषत: माझ्या लॉस एंजिलिसमधील मित्रपरिवाराचे आभार जे कायम माझ्या बाजूला होते. शेवटी माझा नवरा कृष्णाचेही आभार. अपघाताबद्दल समजल्यानंतर तो शूटिंगसोडून लगेच येणार होता. पण मीच त्याला थांबवलं. कारण तो येऊन मला म्हणाला असता 'फायनली नाक काट ली अपनी'."
कश्मिराच्या पोस्टवर इतर कलाकार आणि चाहत्यांनी लवकर बरी हो अशा कमेंट्स केल्या आहेत. कश्मिराच्या अपघाताबद्दल समजल्यानंतर अनेक जण चिंतेत होते.