कस्तुरी मालिकेतील कस्तुरी-समरची जोडी हिट, अभिनेत्री म्हणते, दुःख असूनही इतरांना सुखात...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 04:36 PM2023-07-27T16:36:35+5:302023-07-27T16:40:27+5:30
कस्तुरी हि मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरत आहे.
कलर्स मराठीवर सुरु झालेली कस्तुरी हि मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरत आहे. रियल लोकेशन्स, मालिकेची कथा आणि विशेष म्हणजे पहिल्यांदाच मालिकेद्वारे नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली. जीव झाला येडापिसा मालिकेतील शिवा दादा म्हणजेच अशोक फळदेसाई आणि आपल्या सगळ्यांची लाडकी एकता लब्दे. या दोघांची जोडी भलतीच लोकप्रिय होताना दिसून येत आहे. त्यांच्यातील अबोल नातं, होणाऱ्या भेटीगाठी, त्यांच्यातील संवाद प्रेक्षकांना आवडत आहे. कस्तुरी मालिकेत भाऊ बहिणीची सुंदर गोष्ट बघायला मिळत आहे. कस्तुरीच्या पात्राला अनेक कंगोरे आहेत... ती कधी घरासाठी ढाल म्हणून उभी राहते, तर कधी भावासाठी मायेची सावली, तर कधी भावाला आधार देणारी, त्याचे योग्य वेळी कान धरणारी आई. समर अत्यंत महत्वाकांक्षी, काहीसा स्वार्थी, पण काहीतरी चांगलं करून धाकवण्याची ईच्छा असलेला कुबेर घराण्याचा मुलगा आहे. दोघांच्या राहणीमानात, व्यक्तिमत्वात, त्यांच्या दृष्टिकोनात खूप फरक आहे पण तरीदेखील प्रेक्षकांना कस्तुरी आणि समरची जोडी पसंतीस पडली आहे यात शंका नाही.
आपल्या भूमिकेविषयी बोलताना एकता म्हणाली, "पहिल्यांदा विचारणा झाली तेव्हा मनामध्ये धाकधूक होती. पण आता मला कस्तुरी साकारताना खुप भारी वाटतंय. मुळात एकदम साधं राहणीमान, आपल्यातलीच एक वाटणारी, नॉर्मल कपडे त्यामुळे सगळचं वेगळ आहे. माझ्यासाठी पहिलीच मालिका आहे ही ज्यात मी देव साकारत नाहीये, पौराणिक मालिका माझ्या खुप जवळचा विषय आहे. कस्तुरीचे वैशिष्ट्य म्हणजे खुप मनमोकळी, आनंद पसरवणारी, साधी, नट्टापट्टा न करणारी, दुःख असूनही इतरांना सुखात पाहण्याची इच्छा असणारी, कुटुंब जपणारी आहे आणि म्हणूनच अशी कस्तुरी प्रेक्षकांच्या देखील पसंतीस पडत आहे.
मला जेव्हा सांगण्यात आलं की मोठ्या ताई पेक्षा तुला त्याची आई व्हायचं आहे, लहान वयातच जबाबदारी मुळे मोठी झालीये. तेव्हा मी एक ममत्वाची नजर माझ्या पात्राला दिली, मी त्यावर काम केलं. माझ्या डोळ्यांचे हावभाव, कारण डोळ्यांनी आपण आधी व्यक्त होतं असतो, बोलण्याची स्टायल, माया, प्रेम, निरागसता या सगळ्याचा अभ्यास केला. त्याचवेळेस ती मोठी ताई पण वाटली पाहिजे, बाबांची जबाबदार मुलगी पण वाटली पाहिजे आणि भावंडांना आईची सावली देणारी पण वाटली पाहिजे. हे माझ्यासाठी थोडं आव्हानात्मक होतं माझ्या या वयात सकारायला. मला आलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेवरून त्यांना समर आणि कस्तुरीची जोडी आवडतेय असंच दिसून येत आहे. कस्तुरी आणि समर दोन विरुद्ध टोक आहेत, भिन्न स्वभावाचे आहे म्हणूनच मला असं वाटतं प्रेक्षकांना ते आवडत आहेत आणि हीच खरी गमंत आहे मालिकेची. मुद्दाम आमचा लूकपण तसाच ठेवलाय की एकदम साधी आणि स्वतःकडे लक्षच न देता कायम कुटुंबासाठी धावत- पळत असणारी कस्तुरी आणि दुसरीकडे समर रुबाबदार, श्रीमंत. आतापर्यंत जे भाग झाले त्यात कस्तुरी खुप आवडलीये प्रेक्षकांना मला येणाऱ्या प्रतिक्रियेवरून वरून तरी माझं पात्र पोहोचलय हे पाहुन छान वाटतंय”.
समर कुबेरच्या येण्याने यांच्या नात्याला कुठलं वळण मिळेल ? समर - कस्तुरीच्या नशिबात नियतीने काय लिहून ठेवले आहे ? समरच्या आयुष्यात येण्याने अशी कुठली घटना घडणार ज्यामुळे तिघांच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळणार ? समरच्या मनात दडलेलं असं कुठलं सत्य आहे ज्यापसून कस्तुरी अनभिज्ञ आहे.