ऋषी कपूर यांची ‘ती’ इच्छा राहिली अधुरी...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 11:44 AM2020-04-30T11:44:02+5:302020-04-30T14:31:54+5:30
ऋषी कपूर यांनी आज अचानक जगाचा निरोप घेतला. त्यांची एक इच्छा मात्र अधुरी राहिली.
ऋषी कपूर यांनी आज अचानक जगाचा निरोप घेतला. त्यांची एक इच्छा मात्र अधुरी राहिली. होय, लेकाचे लग्न पाहण्याची त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. गेल्या दोन वर्षांपासून ऋषी कपूर यांना कॅन्सरने ग्रासले होते. कॅन्सर आहे हे कळताच ऋषी कपूर उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाले होते. येथे त्यांनी 11 महिने उपचार घेतले.
याकाळात पत्नी नीतू, मुलगी रिद्धिमा आणि मुलगा रणबीर कपूर सावलीसारखे त्यांच्यासोबत होते. रिद्धिमाचा सुखाचा संसार ऋषी कपूर पाहत होतेच. पण रणबीरचे लग्न पाहण्याची त्यांची मनापासून इच्छा होती. कदाचित आपल्याकडे फार दिवस नाहीत, हे ऋषी यांना माहित होते. त्यामुळेच कॅन्सरचा उपचार करून मुंबईत परतल्या परतल्या त्यांनी रणबीर कपूर व आलिया भट यांच्या लग्नाची बोलणी पुढे नेण्याचा निर्णय घेतला होता.
त्यांच्या कृष्णाराज प्रॉपर्टीच्या नुतनीकरणाचे काम सुरु होते. हे काम संपल्यानंतर याठिकाणी रणबीर व आलियाच्या लग्नानंतरची पहिली पूजा करण्याचा त्यांचा निर्णयही ठरला होता. ऋषी आणि नीतू यांनी 1980 मध्ये पाली हिलमधील एक बंगला विकत घेतला होता.
याच घरात ऋषी व नीतू यांनी 35 वर्षे संसार केला होता. यापश्चात हा बंगला पाडून त्याठिकाणी 15 माळ्यांची बिल्डींग उभी करण्याचे काम सुरु होते. याच नव्या बिल्डींगमध्ये रणबीर व आलियाच्या लग्नानंतरची पूजा संपन्न होणार होती. पण मध्यंतरीच्या काळात रणबीर व आलियाचे लग्न लांबणीवर पडले. यामागचे कारण ठाऊक नाही. पण हो, आता ऋषी कपूर लेकाचे लग्न कधीच पाहू शकणार नाहीत. लेकाचे लग्न पाहण्याची त्यांची इच्छा अधुरी राहिली ती कायमचीच...