खुशबू तावडेने हटके व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज, वयाच्या 38 व्या वर्षी दुसऱ्यांदा होणार आई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 10:55 AM2024-08-11T10:55:15+5:302024-08-11T10:56:35+5:30
खुशबूने आता प्रेग्नंसीमुळे 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेतून एक्झिट घेतली आहे.
मराठमोळी अभिनेत्री खुशबू तावडेने (Khushboo Tawde) नुकतीच गुडन्यूज दिली. खुशबू दुसऱ्यांदा आई होणार आहे. तिची सध्या झी मराठीवर 'सारं काही तिच्यासाठी' ही मालिका सुरु होती. त्यातून आता खुशबूने एक्झिट घेतली आहे. कारण खुशबू सध्या ७ महिन्यांची गरोदर आहे. खुशबू आणि तिचा नवरा अभिनेता संग्राम साळवीने (Sangram Salvi) सोशल मीडियावर हटके व्हिडिओ शेअर करत ही गुडन्यूज दिली.
खुशबू तावडे वयाच्या ३७ व्या वर्षी दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. तिला राघव हा पहिला मुलगाही आहे. खुशबू आणि संग्रामने सोशल मीडियावर एक गोड व्हिडिओ शेअर केला. यामध्ये आधी संग्राम कॅमेऱ्यासमोर येतो तेव्हा 1984 साल लिहिलेलं असतं. नंतर खुशबू येते तेव्हा 1987 वर्ष लिहिलेलं असतं. आणि शेवटी त्यांचा मुलगा राघव येतो तेव्हा 2021 लिहिलेलं. शेवटी संग्राम हातात सोनोग्राफीचा फोटो दाखवतो. त्यावर 2024 लिहिलेलं असतं. अशा हटके पद्धतीने त्यांनी येणाऱ्या बाळाची बातमी चाहत्यांना दिली. 'कुटुंबात आणखी एका छोट्या प्रेमाचं आगमन होत आहे. ऑक्टोबर 2024.'असं गोड कॅप्शन त्यांनी दिलं आहे.
खुशबू आणि संग्रामने दिलेल्या या गुडन्यूजनंतर कलाकार मंडळींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच चाहतेही खूप खूश झालेत. येणाऱ्या पाहुण्यासाठी दोघंही सज्ज आहेत. खुशबू आणि संग्राम 2018 साली लग्नबंधनात अडकले होते. लग्नानंतर तीन वर्षांनी त्यांना राघव हा मुलगा झाला. तर आता दुसऱ्या बाळासाठी ते आतुर आहेत.
खुशबू तावडे 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत काम करताना दिसत होती. तिने साकारलेली उमा खोत प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. मात्र आता ती मालिकेतून बाहेर पडली आहे. प्रेग्नेंसीमुळे तिने हा निर्णय घेतला आहे. आता उमाच्या भूमिकेत अभिनेत्री पल्लवी वैद्य दिसणार आहे.