'हा सिन करताना माझा मी राहीलो नव्हतो'; किरण मानेंची ती पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 12:33 PM2023-10-25T12:33:44+5:302023-10-25T12:37:17+5:30

धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या निमित्ताने किरण माने यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे.

Kiran Mane Post on Facebook on the occasion of Dhammachakra Pravartana Day | 'हा सिन करताना माझा मी राहीलो नव्हतो'; किरण मानेंची ती पोस्ट चर्चेत

'हा सिन करताना माझा मी राहीलो नव्हतो'; किरण मानेंची ती पोस्ट चर्चेत

किरण माने हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी आजवर अनेक मालिका आणि नाटकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मानेंच्या सोशल मीडिया पोस्ट हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे.  खटकणाऱ्या गोष्टींवर परखडपणे मत व्यक्त करणारे माने आवडत्या गोष्टींचंही तितकचं कौतुक करतात.  सध्या मानेंच्या अशाच एका पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे. धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या निमित्ताने किरण माने यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी केळुस्कर गुरूजी आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर भाष्य केलं.

किरण मानेंनी पोस्टमध्ये म्हटलं की, '...पहिलाच सिन होता. स्क्रीप्ट हातात आलं. दहाबारा वर्षांचा एक छोटा पोरगा रोज चर्नी रोड उद्यानात येऊन मनापास्नं अभ्यास करतो. हे मी पहात असतो. त्याच्या वयाची इतर मुलं खेळण्यात गुंग असताना पुस्तकांत रमलेल्या या पोराविषयी माझ्या मनात कुतूहल चाळवतं... मी त्याच्याशी ओळख करून घेतो. बालपणीपास्नं अस्पृश्यतेचे चटके सोसलेला तो पोरगा सुरूवातीला थोडा बुजतो... मी मराठा आहे हे त्याच्या लक्षात येतं. तरीही खांद्यावर हात ठेवून आपुलकीने बोलणार्‍या माझ्याशी तो हळूहळू खुलून बोलू लागतो. मी त्याला महात्मा फुलेंचं 'गुलामगिरी' हे पुस्तक वाचायला देतो. त्या पोराचं नांव असतं 'भिवा'... भिमराव रामजी आंबेडकर ! मी ज्यांची भुमिका करत होतो, ते होते गुरुवर्य केळुस्कर गुरूजी. हो, तेच केळुस्कर गुरूजी ज्यांनी छ. शिवाजी महाराजांचं पहिलं 'ऑथेंटिक' चरीत्र लिहीलं होतं'.

पुढे माने लिहतात, 'हा सिन करताना माझा मी राहीलो नव्हतो. पुर्वी कधीतरी बाबासाहेबांची पुस्तकं वाचताना ज्या माणसाचा उल्लेख बाबासाहेबांनी अत्यंत प्रेमानं, जिव्हाळ्यानं केलेला मी वाचला होता... छोट्या भिवाला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर बनवण्यात ज्या माणसाचा मोलाचा वोटा होता... ती भुमिका साकारायला मिळणं हे माझ्या दृष्टीनं अतिशय आनंद देणारं ठरलं ! केळुस्कर गुरूजींनी नंतर भिवाच्या शिक्षणासाठी जीवाचं रान केलं. परदेशी जायला शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडे भिमरावाची शिफारस केली'.

पोस्टमध्ये माने यांनी लिहलं की, '...सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, बाबासाहेब पहिल्यांदा बुद्धाकडे वळले ते केळुस्कर गुरूजींमुळे. तो सिन करताना मी भारावून गेलो होतो, ज्यावेळी मॅट्रिक पास झालेल्या भिवाचा सत्कार आयोजित करून केळुस्कर गुरूजींनी आशिर्वाद म्हणून त्याला स्वलिखित 'गौतम बुद्ध यांचे चरित्र' हे पुस्तक भेट दिले....बाबासाहेबांनी लिहून ठेवलं आहे की, "दादा केळूस्करांनी दिलेल्या पुस्तकामुळे मी बुद्धाकडे वळलो. त्या लहान वयात बुद्ध आणि त्यांचा धम्म यात रस घेण्याची ही माझी सुरुवात होती. गुरूजींनी पुस्तक दिले तेव्हा भिवा सोळासतरा वर्षांचा होता. पुढे पन्नास वर्षे बाबासाहेबांनी सवड मिळेल तेव्हा गौतम बुद्धांचे चरित्र आणि तत्वज्ञान याचा अभ्यास केला...आणि अखेर या अभ्यासाचं फलित म्हणजे त्यांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला.

'आज 'धम्मचक्र प्रवर्तन दिन' ! आजच्या दिवशी दीक्षाभूमी, नागपूर इथं बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांसोबत बौद्ध धर्मात प्रवेश केला. या घटनेला जो महान माणूस कारणीभूत होता, ती भुमिका साकारायला मिळणं हे माझ्यासाठी अभिनयप्रवासाचं सार्थक करणार्‍या अनेक गोष्टींपैकी एक, खूप काळजाजवळची गोष्ट आहे. धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या मंगलमय शुभेच्छा', असे त्यांनी पोस्टच्या शेवटी म्हटलं. 

किरण माने यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ते कलर्स वाहिनीवरील 'सिंधुताई माझी माई- गोष्ट चिंधीची' या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. या मालिकेत ते सिधुंताई सकपाळ यांच्या वडिलांची भूमिका साकारत आहेत. शिवाय,  माने लवकरच मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महेश मांजरेकरांच्या चित्रपटात ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
 

Web Title: Kiran Mane Post on Facebook on the occasion of Dhammachakra Pravartana Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.