ओपनहायमर चित्रपटाचा वाद आहे तरी काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 02:30 PM2023-07-30T14:30:56+5:302023-07-30T14:32:13+5:30
"माझ्या मते दिग्दर्शकाने एखादी गोष्ट का केली हे समजून घेणं महत्त्वाचं असतं आणि त्या दृष्टीने विचार केला तर नोलनने काही हे आपल्या संस्कृतीचा अपमान करण्यासाठी केलं असेल, अशी शक्यता अजिबातच दिसत नाही."
गणेश मतकरी, चित्रपट समीक्षक -
अणुबॅाम्बचा जनक मानल्या जाणाऱ्या जे राॅबर्ट ओपनहायमर या संशोधकावर प्रख्यात दिग्दर्शक क्रिस्टफर नोलनने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात एक प्रसंग आहे, ज्यात त्याची प्रेयसी; जीन टॅटलाॅक, शयनगृहात त्याला एक पुस्तक दाखवून त्यातले शब्द वाचायला सांगते. हे पुस्तक असतं भगवत गीतेचं आणि तो संस्कृतमधून जे वाक्य भाषांतरित करून जीनला वाचून दाखवतो, ते असतं, ‘ नाऊ आय ॲम बीकम डेथ, द डिस्ट्राॅयर ऑफ वर्ल्ड्स’. या प्रसंगावर, त्यातल्या गीतेच्या वापरावर आता आक्षेप घेण्यात आला आहे आणि प्रसंग पूर्ण कापण्याची मागणी जोर धरायला लागली आहे.
माझ्या मते दिग्दर्शकाने एखादी गोष्ट का केली हे समजून घेणं महत्त्वाचं असतं आणि त्या दृष्टीने विचार केला तर नोलनने काही हे आपल्या संस्कृतीचा अपमान करण्यासाठी केलं असेल, अशी शक्यता अजिबातच दिसत नाही. भगवत गीता हा ओपनहायमरचा आवडता ग्रंथ होता आणि त्याकडे तो धर्मग्रंथ म्हणून नाही, तर तत्त्वज्ञानाचा ग्रंथ म्हणून पाहत असे. त्यात कृष्णाने अर्जुनाला दिलेला एखादी गोष्ट कितीही कठोर वाटली, तरी तिला सामोरं जाण्याचा सल्ला हा ओपनहायमरच्या पुढल्या आयुष्यात त्याला नक्कीच महत्त्वाचा वाटला असणार, हे उघड आहे. पुढे ओपनहायमरला त्याच्या दृष्टिकोनावर प्रभाव टाकणाऱ्या पुस्तकांची यादी करायला सांगितली, तेव्हा त्या यादीत गीता दुसऱ्या क्रमांकावर आहे.
चित्रपटात त्या प्रसंगात जे उद्धृत आहे, ते आणखी एका कारणासाठी महत्त्वाचं आहे. अणुबॅाम्ब चाचणी यशस्वी झाल्यावर ते उद्धृत आपल्या डोक्यात आल्याचं ओपनहायमरने कॅमेरासमोर सांगितलेलं आहे. चित्रपटातही अणू चाचणीच्या प्रसंगात ते पुन्हा येतं.
जीन टॅटलाॅकवर ओपनहायमरचं अतिशय प्रेम होतं; पण तिने त्याला नाकारलं. ही आपली चूक झाल्याचं तिने पुढे बोलून दाखवलेलं आहे. तरीही दोघांची मैत्री राहिली आणि त्यांच्या भेटीगाठी होत. अणुबॅाम्ब प्रकल्पावर काम चालू झालं, तेव्हा ओपनहायमरला प्रकल्पाच्या ठिकाणी राहावं लागलं आणि त्यादरम्यान जीनने आत्महत्या केली. आपण तिला सावरण्यासाठी नव्हतो, असा ग्रह ओपनहायमरने करून घेतला.
चरित्रपटात जेव्हा अनेक तपशील दाखवायचे असतात तेव्हा त्यांना जोडण्यासाठी काही काल्पनिक तर्कशृंखलांचा वापर करावा लागतो. त्या प्रसंगात नोलनने ओपनहायमरचं जीनवरचं प्रेम, भाषेचं ज्ञान, गीतेचं वाटणारं महत्त्व आणि त्या विशिष्ट उद्धृताचं ओपनहायमरच्या डोक्यात पक्कं बसणं, हे सारं एकत्र आणलेलं आहे. संस्कृतमधलं उद्धृत ठळक लक्षात राहणं आणि त्याप्रसंगी चटकन आठवणं, हे शक्य वाटण्यासाठी नोलनने ते जीनच्या तिथे असण्याशी जोडलं असावं, असा माझा समज आहे. जर ते वापरल्याने कोणी दुखावलं जाणार असल्याची कल्पना असती, तर अर्थातच ते टाळणं सोपं होतं.
गीतेला आयुष्यात प्रचंड महत्त्व देणाऱ्या या माणसाच्या जीवनावर क्रिस्टफर नोलनने जो अतिशय आशयघन सिनेमा काढला आहे, त्यातली ही एकच गोष्ट लक्षात ठेवून वाद निर्माण करत राहणं हे हल्लीच्या आपल्या सामाजिक वातावरणाशी सुसंगतच आहे. जे चित्रपटाच्या विरोधात बोलताहेत त्यांना यात ही एकच गोष्ट दिसली आहे का? न पटणारी गोष्ट बाजूला सारून चित्रपटात ज्या घेण्यासारख्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे ते वळू शकले नसते का?