मराठीतील हँडसम हंक रविंद्र महाजनी होते टॅक्सी ड्रायव्हर; असा मिळाला सिनेमात पहिला ब्रेक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 03:27 PM2023-05-29T15:27:11+5:302023-05-29T15:29:29+5:30
Ravindra mahajani: रविंद्र महाजनी टॅक्सी चालवतात या एका गोष्टीमुळे त्यांच्या अनेक नातेवाईकांनी त्यांच्याशी संबंध तोडले.
80 चा काळ गाजवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे रविंद्र महाजनी ( ravindra mahajani). त्याकाळी मराठीतील हँडसम हंक म्हणून रविंद्र महाजनी यांच्याकडे पाहिलं जायचं. आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं. यात 'मुंबईचा फौजदार', 'झुंज', 'कळत नकळत', 'आराम हराम' अशा कितीरी सिनेमांमधील त्यांच्या भूमिका सुपरहिट झाल्या. परंतु, मराठीतील या एव्हरग्रीन अभिनेत्याने त्याच्या करिअरची सुरुवात चक्क टॅक्सी चालवून केली होती. हे फार कमी जणांना माहित आहे. त्यामुळेच त्यांच्या या प्रवासाविषयी जाणून घेऊयात.
अभिनय क्षेत्रात येणाऱ्या पूर्वी रविंद्र महाजनी खरोखर एक टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करत होते. त्यांनी जवळपास ३ वर्ष त्यांनी मुंबईत टॅक्सी चालवली. पण, त्यांच्यातील कलाकार त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यामुळे ते दिवसा वेगवगेळ्या ठिकाणी जाऊन निर्मात्यांच्या भेटी घेत. आणि, रात्री टॅक्सी चालवत. रविंद्र महाजनी मध्यमवर्गीय कुटुंबातील होते मात्र, ते टॅक्सी चालवतात या एका गोष्टीमुळे त्यांच्या अनेक नातेवाईकांनी त्यांच्याशी संबंध तोडले. विशेष म्हणजे ज्यावेळी ते अभिनेता म्हणून नावारुपाला आले त्यावेळी त्यांचे हेच नातेवाईक पुन्हा त्यांच्याशी नीट वागू लागले.
दरम्यान, रविंद्र महाजनी यांनी मराठीसह हिंदी, गुजराती सिनेमांमध्येही काम केलं आहे. रविंद्र महाजनी यांनी व्ही. शांताराम यांच्या झुंज या सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी ‘लक्ष्मी’, ‘दुनिया करी सलाम’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’ यांसारख्या सिनेमात काम केलं. इतकंच नाही तर बॉलिवूडमध्येही ते झळकले आहेत. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ या सिनेमातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.