क्रितिका कामरा, धैर्य कर्वा आणि राघव जुयलची नवी वेबसीरिज 'ग्यारह ग्यारह'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 04:49 PM2023-05-24T16:49:14+5:302023-05-24T16:49:31+5:30
‘ग्यारह ग्यारह’ ही रहस्यमय- फँटसी ड्रामा प्रकारची वेबसीरीज आहे. या सीरीजमध्ये क्रितिका कामरा, धैर्य कर्वा आणि राघव जुयल महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील.
झी५ ने ‘ग्यारह ग्यारह’ या नव्या वेबसीरीजची घोषणा केली आहे. ही सीरीज धर्माटिक एंटरटेनमेंट आणि सिख्या एंटरटेनमेंट अशा दोन नामवंत निर्मिती संस्थांच्या सहकार्याने तयार केली जाणार आहे. ऑस्कर विजेत्या निर्मात्या गुनीत मोंगा आणि अचिन जैन (सिख्या एंटरटेनमेंट) तसेच प्रसिद्ध निर्माते करण जोहर व अपूर्व मेहता (धर्माटिक एंटरटेनमेंट) यांची संयुक्त निर्मिती असलेली ‘ग्यारह ग्यारह’ ही रहस्यमय- फँटसी ड्रामा प्रकारची वेबसीरीज आहे. या सीरीजमध्ये क्रितिका कामरा, धैर्य कर्वा आणि राघव जुयल महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील.
उमेश बिश्त यांनी दिग्दर्शित (पगलेट फेम) केलेली आणि पूजा बॅनर्जी व संजय शेखर यांनी लिहिलेली ‘ग्यारह ग्यारह’ची गोष्ट 1990, 2001 आणि 2016 अशा तीन वेगवेगळ्या दशकांत घडते. त्यात रहस्य, विज्ञान आणि गूढता यांचं अफलातून मिलाफ साधण्यात आला आहे. करण जोहर म्हणाला, ‘या अनोख्या सीरीजसाठी सिख्या एंटरटेनमेंट आणि ZEE5बरोबर सहकार्य करताना आम्हाला आनंद होत आहे. कथेच्या माध्यमातून प्रेक्षकांना प्रेरणा देता येते, त्यांचं मनोरंजन करता येतं, त्यांना आव्हान देता येतं यावर एक फिल्ममेकर म्हणून मी कायमच विश्वास ठेवला आहे. आम्हा तिघांच्या एकत्र येण्यातून नाविन्यपूर्ण आशय निर्मिती होईल आणि सर्व प्रकारच्या प्रेक्षकांना आपल्याशा वाटणाऱ्या नव्या कथा मांडल्या जातील. या भागिदारीमुळे वेगवेगळ्या धाटणीचे स्टोरीटेलर्स एकत्र आले आहेत. त्यातून तयार होणाऱ्या या सीरीजसाठी मी खूप उत्सुक आहे.’
दिग्दर्शक उमेश बिश्त म्हणाले, ‘सर्जनशील लोकांचा समावेश असलेल्या या टीमचा एक भाग होताना मला आनंद होत आहे. ‘ग्यारह ग्यारह’साठी सर्वोत्तम गोष्टी एकत्र आल्या आहेत. सर्वोत्तम निर्माते, ZEE5सारखं जागतिक व्याप्ती असलेलं नेटवर्क, तरुण आणि दमदार कलाकार, कसदार लेखक व कुशल तंत्रज्ञ यासाठी काम करत आहेत. या सीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करता येईल अशी आशा वाटते.’