ऐकाल ते नवलच! कुमार सानूच्या आवाजाने बरे होतात रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 06:24 PM2019-05-08T18:24:53+5:302019-05-08T18:48:04+5:30
कुछ ना कहो या गाण्यावरील परफॉर्मन्स पाहून कुमार सानूला आश्चर्य वाटले आणि त्याला या गाण्यामुळे त्याच्या वास्तविक जीवनातील एक गोष्ट आठवली.
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सुपर डान्सर 3 हा शो सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांचा अत्यंत आवडता लहान मुलांचा डान्स रिअॅलिटी शो बनला आहे. यातील लहान मुलांच्या अद्भुत नृत्य कौशल्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे आणि त्यामुळे तो टीआरपीमध्ये सतत आघाडीवर असतो. शिवाय, दर आठवड्याला या कार्यक्रमात लोकप्रिय कलाकार स्पर्धकांचे मनोबल वाढवण्यासाठी उपस्थिती लावत असतात. त्यामुळे हा कार्यक्रम आणखीनच मनोरंजक होतो. येत्या आठवड्यात या कार्यक्रमात कुमार सानू हजेरी लावणार आहे.
कुमार सानूच्या प्रसिद्ध गाण्यांवर सुपर डान्सरमधील स्पर्धक परफॉर्मन्स सादर करणार असून मातृदिनाच्या निमित्ताने स्पर्धक हे परफॉर्मन्स आपल्या आईला समर्पित करणार आहेत. तसेच कुमार सानू साजन या चित्रपटातील त्यांची प्रसिद्ध गाणी, चुरा के दिल मेरा, आँख मारे आणि इतर अनेक त्याची प्रसिद्ध गाणी गाऊन उपस्थितांचे मनोरंजन करणार आहे. या कार्यक्रमाच्या स्पर्धकांसोबतच कार्यक्रमाचे परीक्षक शिल्पा शेट्टी, अनुराग बासू आणि गीता कपूर त्यांच्या गाण्यांना भरभरून दाद देणार आहेत.
या कार्यक्रमातील प्रेरणा आणि भरत यांनी कुमार सानूच्या कुछ ना कहो या गाण्यावर परफॉर्मन्स सादर केला. हा परफॉर्मन्स पाहून कुमार सानूला आश्चर्य वाटले आणि त्याला या गाण्यामुळे त्याच्या वास्तविक जीवनातील एक गोष्ट आठवली. कुमार सानूने सांगितले की, कुछ ना कहो या गाण्याने एक पांगळा रुग्ण बरा झाला होता. त्यामुळे या गाण्याचा अपंग रुग्णांना बरे करण्यासाठी थेरेपी म्हणून उपयोग केला जाऊ लागला. स्वित्झर्लंडमधील एका हॉस्पिटलनुसार 'कुछ ना कहो' या गाण्यामुळे प्रत्येक वेळेस रुग्णाने प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे मला त्या रुग्णालयात बोलावले गेले आणि माझ्या व्हॉइस फ्रिक्वेंसीचा तज्ज्ञांनी अभ्यास केला. त्यानंतर घोषित करण्यात आले की, माझ्या आवाजाने रुग्ण पक्षाघाताने बरा होऊ शकतो."
कुमार सानूने 40 वर्षांच्या त्याच्या गायन करियरमध्ये सुमारे 20,000 गाणी गायली आहेत आणि त्यांच्या आवाजात रोगी बरे करण्याची अद्भुत कला आहे असे एका रुग्णालयाचे म्हणणे आहे. सुपर डान्सर हा कार्यक्रम प्रेक्षकांना शनिवार आणि रविवारी रात्री आठ वाजता सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनवर पाहायला मिळतो.