कुणालचा नवा लूक
By Admin | Published: September 14, 2016 04:12 AM2016-09-14T04:12:56+5:302016-09-14T04:12:56+5:30
शेफ कुणाल कपूर एका सीझनच्या ब्रेकनंतर पुन्हा ‘मास्टरशेफ’ या कार्यक्रमात झळकणार आहे. कुणालने गेल्या काही महिन्यांत २० किलो वजन कमी केले आहे.
शेफ कुणाल कपूर एका सीझनच्या ब्रेकनंतर पुन्हा ‘मास्टरशेफ’ या कार्यक्रमात झळकणार आहे. कुणालने गेल्या काही महिन्यांत २० किलो वजन कमी केले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना एक वेगळा कुणाल या सीझनमध्ये पाहायला मिळणार आहे. कुणालच्या या नव्या लूकबाबत त्याच्याशी मारलेल्या गप्पा...
ल्लतुझा पूर्ण लूकच बदलला आहे. एक वेगळा कुणाल आम्हाला पाहायला मिळतोय. याचे कारण काय?
-मी २० किलो वजन कमी केले आहे. माझे वजन खूपच जास्त होते. पण या गोष्टीकडे मी कधीही लक्ष दिले नव्हते. पण एकदा मला काही पायऱ्या चढल्यानंतर चांगलाच दम लागला होता. तेव्हा काहीही करून वजन कमी करायचे, असे मी ठरवले. एका शेफला खाण्यापासून दूर ठेवणे ही खूप कठीण गोष्ट आहे. तरीही मी माझ्या जिभेवर ताबा ठेवला. तसेच दिवसाला पाच-सहा किमी अंतर पायी चाललो. या सगळ्या गोष्टींमुळे माझे वजन कमी झाले.
ल्लआज राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर तुझे नाव झाले आहे. तुला इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागली?
-१९९९ ची गोष्ट आहे. एका मुलाने किचनमध्ये जाऊन जेवण करणे त्या वेळी लोकांना मान्यच नसायचे. पण माझ्या आई-वडिलांनी मला खूप पाठिंबा दिला. मी शेफ बनण्याचे खूळ डोक्यातून काढावे, असे माझ्या नातलगांना वाटत असे. पण याकडे त्यांनी मला नेहमीच दुर्लक्ष करायला सांगितले. त्यामुळे मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करू शकलो. माझी पहिली नोकरी मला कशी मिळाली, ते मला आजही आठवतेय. २५० मुलांमधून केवळ पाच जणांची निवड होणार होती. यासाठी तुमची सगळ्यात चांगली डिश तुम्हाला बनवायची होती. मी एकही मिनिट आराम न करता १२ तासांच्या अवधीत तीन डिश बनवल्या होत्या. त्या डिशमुळेच मला नोकरी मिळाली. त्या वेळी मला ३५०० रुपये पगार मिळत असे. मला आठवतेय, एकदा माझ्या शेफला मी एक सूप बनवून दिले होते. ते सूप पाहून ते प्रचंड चिडले होते. माझे काय चुकले मला काहीच कळत नव्हते. त्यांनी रागाने ते सूप भिंतीवर फेकून दिले. त्या वेळी मी एका छोट्या मुलासारखा रडलो होतो. त्यांनी मला रागातच विचारले, सूप प्यायला चमचा कुठे आहे? त्या वेळी जेवण बनवण्यासोबतच याही गोष्टी किती महत्त्वाच्या असतात हे मला समजले.
ल्लतुझ्या करिअरचा टर्निंग पॉइंट कोणता होता?
-पाच वर्षे हॉटेलमध्ये काम करीत असताना तेच तेच काम करून आणि १२-१४ तास रोज काम करून मी अक्षरश: कंटाळलो होतो. त्यानंतर मी एक शेफ म्हणून स्वत:ला सिद्ध करायचे ठरवले आणि त्यानंतर मी वेगवेगळ्या डिशेस बनवायला लागलो. त्या डिशेस लोकांना प्रचंड आवडायलाही लागल्या. त्यानंतर मी कधीच मागे वळून पाहिले नाही.
ल्लया सीझनमध्ये प्रेक्षकांना काय वेगळे पाहायला मिळणार आहे?
-प्रेक्षकांना या वेळी भारतीय जेवणासोबतच पाश्चिमात्य जेवणाची पाककृतीही पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी मला ज्या वेळी सगळ्यात पहिल्यांदा विचारण्यात आले होते, त्या वेळी मला आश्चर्याचा धक्काच बसला होता. मी एक साधा शेफ असताना मला का बोलावले जात आहे, हा प्रश्न मला पडला होता. पण या कार्यक्रमाने मला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. आज हा कार्यक्रम माझ्या आयुष्याचा एक भाग बनला आहे. गेल्या सीझनच्या वेळी मी परदेशात एक कार्यक्रम करीत असल्याने मला हा कार्यक्रम करणे शक्य झाले नव्हते. पण आता पुन्हा मी या कार्यक्रमाचा भाग झाल्याने मी खूप आनंदित आहे.