किरण रावच्या 'लापता लेडीज'ची गाडी सुसाट, रणबीर कपूरच्या Animal लाही टाकलं मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 02:09 PM2024-05-23T14:09:31+5:302024-05-23T14:10:22+5:30
'लापता लेडीज' मधील कलाकारांचा सहज सुंदर अभिनय आणि उत्तम कथा पाहून प्रेक्षकांनी केलं कौतुक
किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' सिनेमाने प्रेक्षकांचं मन जिंकलंय. कलाकरांचा अगदी सहज सुंदर अभिनय, उत्तम कथानक यामुळे सिनेमाचं भरभरुन कौतुक होतंय. सुरुवातीला थिएटरमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाल्यानंतर सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. ओटीटीवर प्रेक्षकांचा सिनेमाला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. याचाच परिणाम म्हणजे 'लापता लेडीज' (Laapata Ladies) रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' (Animal) लाही मागे टाकलं आहे.
रणबीर कपूरचा 'अॅनिमल' हा बहुचर्चित सिनेमा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रिलीज झाला होता. संदीप रेड्डी वांगा यांनी सिनेमा दिग्दर्शित केला होता. या सिनेमाने बॉक्सऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. सिनेमावर तितकीच टीकाही झाली होती. किरण रावनेही सिनेमाबाबतीत आक्षेप व्यक्त केला होता. यानंतर दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा आणि किरण राव यांच्यात शाब्दिक वाद झाले. दरम्यान किरण रावचा 'लापता लेडीज' प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत होता. आता या सिनेमाने नेटफ्लिक्सवर मोस्ट रिव्ह्यूमध्ये अॅनिमलला मागे टाकल्याने चाहते खूश झालेत. 'अॅनिमल'ला आतापर्यंत नेटफ्लिक्सवर 13 मिलियन व्ह्यूज मिळाले होते. तर आता 'लापता लेडीज' 13.8 मिलियनवर पोहोचला आहे. अजूनही सिनेमा नेटफ्लिक्सवर जोरात सुरु आहे.
नेटफ्लिक्सवर सध्या हृतिक रोशन आणि दीपिकाचा 'फायटर' सिनेमा आघाडीवर आहे. सिनेमाला १४ मिलियन व्ह्यूज आहेत. 'लापता लेडीज'ची गाडी अशी सुसाट सुरु राहिली तर हा सिनेमा 'फायटर'लाही मागे टाकू शकतो. ज्योती देशपांडे यांनी 'लापता लेडीज'ची निर्मिती केली आहे.