‘लालबागची राणी’ लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टला बोनी कपूर
By Admin | Published: May 26, 2016 02:31 AM2016-05-26T02:31:11+5:302016-05-26T02:31:11+5:30
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘लालबागची राणी’ या आगामी मराठी चित्रपटाचे धमाकेदार ‘लाइव्ह म्युझिक कॉन्सर्ट’ लालबाग येथे पार पडले. या म्युझिक कॉन्सर्टला बॉलीवूडचे तगडे दिग्दर्शक बोनी कपूर
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘लालबागची राणी’ या आगामी मराठी चित्रपटाचे धमाकेदार ‘लाइव्ह म्युझिक कॉन्सर्ट’ लालबाग येथे पार पडले. या म्युझिक कॉन्सर्टला बॉलीवूडचे तगडे दिग्दर्शक बोनी कपूर उपस्थित होते. लालबाग येथील नागरिकांसाठी विशेष आयोजित या भव्य कार्यक्रमात चित्रपटाच्या गाण्यांची प्रत्यक्ष मजा अनुभवण्यासाठी प्रेक्षकांनीही तुडुंब गर्दी केली होती. तसेच बोनी कपूर यांनी मराठीत बोलून प्रेक्षकांमध्ये उत्साह वाढवला व या चित्रपटातील कलाकरांचे कौतुकदेखील केले. तर या कॉन्सर्टमध्ये हिंदीतील सुप्रसिद्ध गायक दिव्य कुमार यांच्या सुरेल आवाजाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. चित्रपटामधील त्यांच्या आवाजातील ‘लाडाची मुंबई’ या मुंबई अॅन्थम गाण्याला वन्समोअरदेखील मिळाला.
वैशाली भैसणे माडे आणि जान्हवी प्रभू अरोरा यांच्या ‘रूप तेरा’ या गाण्याने सर्वांना ठेका धरायला लावला, तर कीर्ती संगठिया यांच्या हृदयस्पर्शी ‘मला रंग मिळाले’ या गाण्याने उपस्थितांची वाहवा मिळवली. तसेच ‘आली आली लालबागची राणी’ या आदर्श शिंदेच्या भारदस्त आवाजातील गाण्याला मिळालेल्या प्रेक्षकांच्या टाळ्या आणि शिट्यांच्या प्रतिसादाने मैदान दुमदुमून गेले. या गाण्यावर लालबागकरांसोबत सिनेमाचे कलाकारदेखील नाचले.
रोहित नागभिडे यांच्या बहारदार संगीतशैलीने प्रत्येक गाण्याची वेगळी ओळख निर्माण झाली असल्याचे कौतुक झाले. वीणा जामकरसह चित्रपटातील इतर कलाकार प्रथमेश परब, अशोक शिंदे, पार्थ भालेराव, नेहा जोशी, जयवंत वाडकर,
प्रतिमा जोशी, सुयश जोशी, रेश्मा नाईक यांनीही प्रेक्षकांशी संवाद साधून भावनिक नाते निर्माण केले. हिंदीतील अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केलेल्या ‘मॅड एंटरटेनमेंट’ बॅनरखाली सुनील मनचंदा यांनी या सिनेमाची निर्मिती केली असून, ‘लालबागची राणी’ हा कौटुंबिक मनोरंजक चित्रपट ३ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.