प्रभाकर जोग यांना लता मंगेशकर पुरस्कार

By Admin | Published: September 29, 2015 03:03 AM2015-09-29T03:03:24+5:302015-09-29T03:03:24+5:30

राज्य शासनातर्फे प्रदान करण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०१५ या वर्षासाठी ज्येष्ठ व्हायोलिनवादक व संगीतकार प्रभाकर जोग यांना जाहीर करण्यात आला आहे

Lata Mangeshkar Award for Prabhakar Jog | प्रभाकर जोग यांना लता मंगेशकर पुरस्कार

प्रभाकर जोग यांना लता मंगेशकर पुरस्कार

googlenewsNext

मुंबई : राज्य शासनातर्फे प्रदान करण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०१५ या वर्षासाठी ज्येष्ठ व्हायोलिनवादक व संगीतकार प्रभाकर जोग यांना जाहीर करण्यात आला आहे. ५ लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीतील संगीतकार अजय व अतुल यांनी प्रभाकर जोग यांच्या नावाची शिफारस केली. इतर सर्व सदस्यांनी एकमताने प्रभाकर जोग यांच्या नावास अनुमोदन दिले. या समितीत सांस्कृतिक कार्य सचिव वल्सा नायर सिंह, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, स्वानंद किरकिरे, श्रेया घोषाल यांचा समावेश आहे. संगीतकार, संगीत संयोजक आणि व्हायोलिन वादक म्हणून तब्बल ६०हून जास्त वर्ष कार्य केलेल्या प्रभाकर जोग यांचे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत तसेच भावसंगीतातही मोलाचे योगदान आहे.
वयाच्या १२व्या वर्षी पुण्यातील वाड्यांमधून सव्वा रुपया आणि नारळ या बिदागीवर व्हायोलिन वादनाचे कार्यक्रम करणारे जोग हे पुढे संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांचे सहायक झाले. गीतरामायणांमधील गाण्यांमध्ये प्रभाकर जोग यांचे व्हायोलिनचे सूर असत. त्यांनी गीतरामायणाच्या सुमारे ५०० कार्यक्रमांना साथ दिली. ‘लपविलास तू हिरवा चाफा’ या गीतापासून प्रभाकर जोग हे स्वतंत्र संगीतकार म्हणून महाराष्ट्राला माहीत झाले. स्नेहल भाटकर यांच्याकडे जोग यांनी ‘गुरुदेवदत्त’ या १९५१ सालच्या चित्रपटात व्हायोलिन वादनाचे काम केले. जोग यांनी नोटेशन कलेत प्रावीण्य मिळवले. त्यांनी मराठी चित्रसृष्टीतील संगीतकार श्रीनिवास खळे, दशरथ पुजारी, पं. हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, वसंत पवार, राम कदम व वसंत प्रभू यांच्यासोबत काम केले. ‘जावई माझा भला’ हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट असून, त्यांनी २२ चित्रपटांना संगीत दिले.

Web Title: Lata Mangeshkar Award for Prabhakar Jog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.