शाही थाटात पुन्हा लक्ष्मीबाग!
By Admin | Published: July 11, 2015 10:38 PM2015-07-11T22:38:26+5:302015-07-11T22:38:26+5:30
दक्षिण मुंबई हे हिंदुस्तानी संगीताचं एक माहेरघर म्हणून इतिहासात नोंदलं गेलं आहे. खरं म्हणजे आपण आता ज्या भागाला दक्षिण मुंबई म्हणतो तीच पूर्वी अवघी मुंबई होती.
रागदारी
- अमरेंद्र धनेश्वर
दक्षिण मुंबई हे हिंदुस्तानी संगीताचं एक माहेरघर म्हणून इतिहासात नोंदलं गेलं आहे. खरं म्हणजे आपण आता ज्या भागाला दक्षिण मुंबई म्हणतो तीच पूर्वी अवघी मुंबई होती. निरनिराळ्या शेठ-सावकारांचे आणि श्रीमंतांचे वाडे अथवा बंगले या भागात होते. आहिताग्नी राजवाडेंच्या आत्मवृत्तात तसंच गोविंदराव टेंबेंच्या ‘माझा संगीत व्यासंग’ या पुस्तकात दक्षिण मुंबईतल्या मैफलींची रसभरीत वर्णनं वाचायला मिळतात. या शाही थाटाच्या वास्तूपैकी एक म्हणजे लक्ष्मीबाग.
गिरगावात आॅपेरा हाऊस आणि प्रार्थना समाज यांच्या मधोमध लक्ष्मीबाग आहे. सव्वाशे वर्षांपूर्वी नारायण दाभोळकर आणि लक्ष्मीबाई दाभोळकर या दानशूर दाम्पत्यांच्या मुलाने हे सभागृह बांधलं. नारायण दाभोळकरांच्या नावे एक रस्ता मलबार हिल परिसरात आहे. लक्ष्मीबार्इंच्या नावे काही नव्हतं म्हणून हे सभागृह. या सभागृहात १९३0 ते १९७0 या काळात अनेक मैफली झाल्या आहेत. केशरबाई केरकर, बडे गुलाम अली, अहमदजान थिरकवा, रविशंकर, विलायत खान, हवीम जाफर खान, अंजनीबाई लोलयेकर, मोगूबाई कुर्डीकर वगैरे कलाकार इथे नेहमीच कार्यक्र म करत असत.
‘देवधर्स स्कूल आॅफ म्युझिक’ला ७५ वर्षं पूर्ण झाली तेव्हा इथे कार्यक्रम झाल्याचं स्मरतं. कुमार गंधर्वांनी तर इथे अनेक मैफली गाजवल्या. अशा या लक्ष्मीबागेत डॉ. तेजस्विनी निरंजना, सुरभी शर्मा आणि कैवान मेहता यांनी पुन्हा एकदा मैफल घडवून आणली. अत्यंत देखणा आणि सुबक दिवाणखाना असावा असे हे सभागृह. धोंडूताई कुलकर्णींसारख्या बुजुर्ग गुरूकडे शिकलेली ऋतुजा लाड या मैफलीत सुरुवातीला गायली. तिथे ‘नंद’ आणि ‘मीराबाई की मल्हार’ हे राग अत्यंत व्यवस्थित मांडले.
ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका नीला भागवत यांच्या शिष्या रेश्मा गीध यांचंही गायन या मैफलीत झालं. त्यांनी ‘पूरिया धनाश्री’ आणि ‘केदार’ या रागातले ख्याल ऐकवले. अत्यंत आत्मविश्वासपूर्ण मांडणी आणि गाण्यातल्या सर्व अंगांचा समतोल त्यात होता. विनोद पडघे (हार्मोनियम), माधव पवार आणि उमेश मुलिक (तबला) यांनी साथसंगत केली.