लक्ष्याने 3० वर्ष आधीच सांगितली होती 'ही' गोष्ट, आजही जैसे थे परिस्थिती; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 12:58 PM2023-07-08T12:58:37+5:302023-07-08T13:06:40+5:30
बॉलिवूडच्या तुलनेत मराठी सिनेमा चालत नाही ही ओरड आधीपासूनची आहे.
मराठी सिनेमा म्हणलं की आठवतात ते दादा कोंडके, निळू फुले, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांसारखे दिग्गज कलाकार. त्यांच्यामुळेच मराठी सिनेसृष्टी ओळखली जाते. आजची पिढी सुद्धा त्यांच्या सिनेमांची चाहती आहे. पण बॉलिवूडच्या तुलनेत मराठी सिनेमा चालत नाही ही ओरड आधीपासूनची आहे. लक्ष्मीकांत बेर्डेने (Laxmikant Berde) 30 वर्षांपूर्वीच प्रेक्षकांना सल्ला दिला होता मात्र परिस्थिती अजून जैसे थेच आहे.
मराठी सिनेमांना प्रेक्षक गर्दी करत नाही तेच बॉलिवूडच्या हिंदी सिनेमांना मात्र थिएटर भरलेले असतात. मराठी प्रेक्षकच मराठी सिनेमांना वाचवू शकतात. जसं साऊथला त्यांचे लोक उत्साहाने सिनेमा बघायला जातात त्याप्रमाणेच जोवर मराठी प्रेक्षक उत्साह दाखवत नाहीत तोवर मराठी सिनेमा चालणार नाही असं मत लक्ष्मीकांत बेर्डे यांनी ३० वर्षांपूर्वीच व्यक्त केलं होतं. मात्र आजही परिस्थिती फारशी बदललेली नाही. मराठी सिनेमा बघायला या म्हणून प्रेक्षकांना विनंती करावी लागते. तेच बॉलिवूड सिनेमा बघण्यासाठी मात्र प्रेक्षक आवर्जुन जातात. मराठी पेक्षा बॉलिवूडमध्ये काम करणं जास्त प्रतिष्ठेचं मानलं जातं. लक्ष्याचा हा व्हिडिओ 'ओल्ड इज गोल्ड' या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला असून प्रचंड व्हायरल होतोय.
हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी लक्ष्याची आठवण काढली आहे. मराठीतील आतापर्यंतचा सर्वात ग्रेट कॉमेडी कलाकार म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. त्याने मराठी सिनेमा आणि प्रेक्षकांबाबतीत केलेलं वक्तव्य आजही तंतोतंत लागू होत आहे. यापूर्वी अभिनेता सुबोध भावेनेही हिंदी नाही तर मराठी सिनेमा, मराठी कलाकारांबाबतीत पोटतिडकीने वक्तव्य केलं होतं. सध्या परिस्थिती हळूहळू बदलतही आहे. 'सैराट', 'झिम्मा', 'वाळवी', 'बाईपण भारी देवा' सारखे अनेक मराठी सिनेमे सुपरहिट झाले. प्रेक्षकांनी पाठिंबा दिला तरच मराठी सिनेमा पुढे जाऊ शकतो हे नक्की.