‘अवघ्या ११व्या वर्षी गिरविले अभिनयाचे धडे’

By Admin | Published: November 9, 2016 03:27 AM2016-11-09T03:27:25+5:302016-11-09T03:27:25+5:30

निशिगंधा वाड यांनी अनेक मराठी मालिका, चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी मालिका, बॉलिवूडमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे

'Lessons Lessons Only 11 Years' | ‘अवघ्या ११व्या वर्षी गिरविले अभिनयाचे धडे’

‘अवघ्या ११व्या वर्षी गिरविले अभिनयाचे धडे’

googlenewsNext

निशिगंधा वाड यांनी अनेक मराठी मालिका, चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी मालिका, बॉलिवूडमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच त्यांनी अभिनय सांभाळून दोन विषयांत पीएच.डी.देखील केली आहे. अशा या अष्टपैलू अभिनेत्रीसोबत सीएनएक्सने मारलेल्या गप्पा...

रंगभूमीवर काम करत असताना तुम्ही
मालिका आणि चित्रपटांकडे कशा वळल्या?
मी जयवंत दळवी यांच्या आवाहन या मालिकेत काम केले होते. या मालिकेने मला खरी ओळख मिळवून दिली. या मालिकेतील माझे काम आवडल्यामुळे मला अनेक आॅफर्स मिळायला लागल्या. ‘कुणी तरी आहे तिथे’ हे माझे नाटक खूप गाजले होते. या नाटकामुळे मला ‘एकापेक्षा एक’ हा माझा पहिला चित्रपट मिळाला. माझ्यया पहिल्या चित्रपटाच्या वेळी तर मी बी.ए.च्या शेवटच्या वर्षाला होते. यानंतर मी ‘शेजारी शेजारी’ चित्रपट केला. माझे हे दोन्हीही चित्रपट लागोपाठ प्रदर्शित झाले. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आणि मी मराठी चित्रपटसृष्टीत स्थिरावले.

गेली अनेक वर्षे तुम्ही अभिनयक्षेत्रात आहात. तुमचा हा अभिनयाचा प्रवास कसा सुरू झाला?
सहावीत असताना मला अभिनयाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली. त्यानंतर सुलभा देशपांडे यांच्या आविष्कार या संस्थेत मी अभिनयाचे धडे गिरवू लागले. मी खूपच लहान वयात नाटकांत काम करू लागले. मोरूची मावशी या नाटकात काम करत असताना मी केवळ दहावीला होते. मोरूच्या मावशीच्या वेळी तर मी कानात बोटे घालून अभ्यास करत असे. कधी कधी तर यामुळे माझी एंट्रीदेखील चुकायची. पण अभ्यास आणि अभिनय या दोन्ही गोष्टींचा मी सुरुवातीपासून ताळमेळ घातला. मी मोहन वाघ यांच्यासोबत नाटक करत होते. त्या वेळी मी रूपारेल कॉलेजला होते. मला कॉलेजला दांड्या मारणे अजिबात आवडायचे नाही. त्यामुळे दौऱ्यावरून रात्री उशिरा आले की, मी मोहनकाकांच्याच घरी राहायचे आणि सकाळी लवकर उठून कॉलेजला जायचे. त्या वेळी मोहनकाकांच्या पत्नी अगदी मुलीप्रमाणे माझी काळजी घ्यायच्या. त्या मला कॉलेजला जाताना डबादेखील करून द्यायच्या. या सगळ्यात माझ्या कुटुंबाचादेखील मला तितकाच पाठिंबा मिळाला. माझे वडील आर्मीत होते. त्यांना आपल्या भारत सरकारकडून रक्षाचक्रदेखील मिळाले आहे. तर माझी आई शिक्षिका. या दोघांकडून मिळालेल्या संस्कारामुळेच मी सगळ्या गोष्टी योग्यरीतीने करू शिकले.
हिंदी मालिका आणि चित्रपटांतदेखील तुम्ही नेहमीच खूप चांगल्या भूमिका साकरल्या आहेत. हिंदी इंडस्ट्रीत तुमचा प्रवेश कसा झाला?
हिंदी इंडस्ट्रीमध्ये रंगभूमीवर काम करणाऱ्या मराठी कलाकारांना नेहमीच आदराचे स्थान आहे. त्यामुळे आज मराठी इंडस्ट्रीतील अनेकजण तिथे आपले एक वेगळे स्थान निर्माण करू शकले आहेत. मी हृषीकेश मुखर्जी यांच्यासोबत नोकझोक, छोटी बहू यांसारख्या मालिका केल्या होत्या. हृषीकेश मुखर्जी यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली हे मी माझे भाग्यच समजते. त्यानंतर मला हिंदीत अनेक मालिका, चित्रपटांच्या आॅफर्स मिळत गेल्या. आज अमिताभ बच्चन, सलमान खान, हृतिक रोशन या हिंदीतील सगळ्याच मोठ्या कलाकारांसोबत मी काम केले आहे.
तुम्ही काम आणि घर यांच्यात ताळमेळ कसा घातला?
ल्ल माझे लग्न झाले तेव्हा मी अवघी २२-२३ वर्षांची होते. पण माझ्या पतीने मला खूप सांभाळून घेतले. माझी मुलगी लहान असताना तर मी तिला घेऊन चित्रीकरणाला जात असे. पण प्रवासामुळे तिला त्रास व्हायला लागला. त्यामुळे मी चित्रपट आणि मालिकांमधून काही महिन्यांचा ब्रेक घेतला आणि त्यादरम्यान माझी पहिली पीएच.डी. केली.
सध्या तुम्ही माँ... जो सबके लिये बनी अम्मा या मालिकेत शबाना आझमींसोबत काम करत आहात. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे?
शबाना आझमी केवळ एक कलाकारच नाही तर त्या एक माणूस म्हणूनही तेवढ्याच चांगल्या आहेत. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सगळ्याच कलाकारांचा त्या प्रचंड आदर करतात. मी लिहिते, हे ज्या वेळी त्यांना कळले, त्या वेळी त्यांनी मला ‘कैफी आणि मी’ हे त्यांच्या आईने लिहिलेले पुस्तक भेट म्हणून दिले. त्यांच्यासोबत काम करताना मला खूप काही शिकायला मिळत आहे. आमची ही मालिका काहीच
भागांचीच आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये काहीच भागांच्या
मालिका प्रेक्षक आवडीने पाहतात. त्यामुळे
आपल्याकडेदेखील ठरावीक भागांच्याच मालिका बनवल्या गेल्या पाहिजेत, असे मला वाटते.

Web Title: 'Lessons Lessons Only 11 Years'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.