छोटा 'राजन' मोठ्या पडद्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2016 03:24 AM2016-11-09T03:24:38+5:302016-11-09T03:24:38+5:30
विविध अंडरवर्ल्ड डॉनच्या जीवनावर आधारित अनेक सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकले आहेत. काही महिन्यांपूर्वी मराठीत अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या जीवनावर आधारित दगडी
विविध अंडरवर्ल्ड डॉनच्या जीवनावर आधारित अनेक सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकले आहेत. काही महिन्यांपूर्वी मराठीत अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या जीवनावर आधारित दगडी चाळ हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला होता. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या आयुष्यावरील 'राजन' हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. भरत सुनंदा यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन केले आहे. अंडरवर्ल्डवर आधारित सिनेमांमध्ये मराठीत कधीही न पाहिलेला थरार रसिकांना ‘राजन’ या सिनेमामधून अनुभवता येणार आहे. सिनेमात छोटा राजनची मध्यवर्ती भूमिका कोण साकारत आहे, हे मात्र अजूनही गुलदस्तातच आहे. आयुष्यात काही तरी मोठे करण्याची धडपड प्रत्येक माणसाची असते. समाजात वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. मात्र, आपल्या उराशी बाळगलेले ध्येय पूर्ण करण्याची जिद्द कधी कधी त्याला चुकीच्या मार्गावर घेऊन जाते आणि त्याच्या आयुष्यातील हेच बदल ‘राजन’ या सिनेमाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, असे दिग्दर्शक भरत सुनंदा यांनी सांगितले आहे. याआधी रुपेरी पडद्यावर वास्तव, कंपनी, वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई, डॅडी, दयावान, द डे, शूटआऊट एट वडाळा, शूट आऊट एट लोखंडवाला असे अंडरवर्ल्ड डॉनवर आधारित सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकले आहेत. आता याच सिनेमांप्रमाणे छोटा राजनच्या आयुष्यावरील 'राजन' हा सिनेमाही रसिकांच्या पसंतीस उतरावा, अशी आशा सिनेमाच्या निर्मात्यांना आहे.