अॅसिड प्यायल्यामुळे झाला मुनव्वर फारुकीच्या आईचा मृत्यु; कॉमेडिअनने Lock Upp मध्ये शेअर केलं सिक्रेट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 02:20 PM2022-04-18T14:20:57+5:302022-04-18T14:21:27+5:30
Munawar faruqui: काही दिवसांपूर्वी त्याने त्याच्या पत्नी आणि मुलाचं सत्य जाहीरपणे मान्य केलं होतं. त्यानंतर आता त्याने त्याच्या आईविषयी एक मोठा खुलासा केला आहे.
अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) लॉकअप (Lock Upp) हा शो सुरु झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय झाला आहे. त्यामुळे या शोमधील प्रत्येक स्पर्धक सोशल मीडियावर चर्चेत असतो. यामध्येच आता मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी त्याने त्याच्या पत्नी आणि मुलाचं सत्य जाहीरपणे मान्य केलं होतं. त्यानंतर आता त्याने त्याच्या आईविषयी एक मोठा खुलासा केला आहे. त्याचा हा खुलासा ऐकून कंगनादेखील थक्क झाली.
२००७ मध्ये मुनव्वरच्या आईसोबत असा एक किस्सा घडला ज्यामुळे त्यांचं निधन झालं. विशेष म्हणजे मुनव्वरला त्याच्या आईविषयीचीही माहिती अखेरच्या क्षणी मिळाली. त्यामुळे तो त्या घटनेमुळे आजही भावुक होतो.
"माझ्या आईने अॅसिड प्यायलं होतं ज्यामुळे तिची डायजेस्टिव्ह सिस्टीम डॅमेज झाली होती. यामुळेच तिचं निधन झालं. मुळात ही घटना घडण्यापूर्वी तिने आठवडाभर काहीही खाल्लं नव्हतं. परंतु, ही गोष्ट लक्षात यायला बराच काळ लोटला", असं मुनव्वरने सांगितलं. मुनव्वरची आईची शेवटची घटका मोजत असताना त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, त्यांचं निधन झालं.
"माझ्या आईने आयुष्यात खूप कष्ट केले. दु:ख सहन केलं. २० वर्ष ती तिच्या संसाराचा गाडा ओढत होती. ना तिच्या नवऱ्याने कधी तिची साथ दिली ना कुटुंबाने. पण, कुटुंब चालवण्यासाठी ते चकल्या, पापड करुन ते विकायची. तिने ३५०० रुपयांचं लोन घेतलं होतं. या किरकोळ लोनसाठी तिला अनेकदा टोमणे सहन करावे लागले होते", असं मुनव्वर म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "आईच्या शेवटच्या क्षणीही मी तिची साथ देऊ शकलो नाही. जर मी थोडे प्रयत्न केले असते किंवा तिला मदत केली असती तर आज ती माझ्यासोबत असती."
दरम्यान, यापूर्वीही मुनव्वर अनेकदा त्याच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आला आहे. अलिकडेच मुनव्वरने त्याच्या वैवाहिक जीवनाविषयीचं सत्य सर्वांसमोर सांगितलं. त्यानंतर शोमधील स्पर्धकांसह प्रेक्षकही हैराण झाले होते.