महाराष्ट्रात पुन्हा होणार सिंहगर्जना ! लोकमान्य टिळकांचा असामान्य प्रवास उलगडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 06:49 PM2022-12-14T18:49:04+5:302022-12-14T19:08:05+5:30
घड्याळ्याच्या काट्याला बांधून दिवसरात्र धावणाऱ्या, भूतकाळाचे ओझे भिरकावून देत काळासोबत चालणाऱ्या लोकमान्य टिळकांचा असामान्य प्रवास अचंबित करणारा आहे. तो मालिकेतून पाहणं प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा ठरेल.
झी मराठी वाहिनीचं गेल्या २- ३ वर्षांपासून प्रेक्षकांसोबत अतूट नातं आहे. ही फक्त एक वाहिनी नसून मराठी संस्कृतीचं प्रतिबिंब आहे. झी मराठीवर सुरु होणारी एक मालिका म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवन चरित्रावर ही नवीकोरी मालिका सुरु होणार आहे.
लोकमान्यांचं असामान्य व्यक्तिमत्त्व राजकीय, सामाजिक आणि कौंटुंबिक स्तरावर त्या काळात कसं घडलं, हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्व अबालवृद्धांना आजही आहे. आपलं म्हणणं प्रभावीपणे मांडता येण्याच्या कसोटी काळात सध्या आपण आहोत. टिळकांसारखी प्रभावी वक्तृत्त्वशैली आपल्याकडेही असावी, असे वाटण्याचा हा काळ आहे, म्हणून आजच्या काळाला साजेशा लोकमान्य टिळकांची चरित्रगाथा लोकमान्य या मालिकेतून झी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे.
टिळकांच्या राजकीय प्रवासाबरोबरच त्यांच्या कौटुंबिक आयुष्यातील महत्त्वाचे घटना-प्रसंग या मालिकेत पहायला मिळणार आहेत. टिळकांचा विवाह, त्यांचे महाविद्यालयीन जीवन, त्यांचे विविधांगी लेखन, राजकीय स्तरावरील त्यांच्या कारकिर्दीचे महत्त्वपूर्ण टप्पे या मालिकेतून प्रेक्षकांना पहायला मिळतील. ते जहाल विचारांचे थोर भारतीय नेते होते.
घड्याळ्याच्या काट्याला बांधून दिवसरात्र धावणाऱ्या, भूतकाळाचे ओझे भिरकावून देत काळासोबत चालणाऱ्या लोकमान्य टिळकांचा असामान्य प्रवास अचंबित करणारा आहे. तो मालिकेतून पाहणं प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा ठरेल. ह्या मालिकेचं लेखन केलं आहे आशुतोष परांडकर यांनी तर स्वप्निल वारके हे दिग्दर्शक आहेत. दशमी क्रिएशन्स हे या मालिकेचे निर्मिते आहेत. या मालिकेतून अभिनेता क्षितीज दाते आणि अभिनेत्री स्पृहा जोशी प्रमुख भूमिकेत असणार आहेत.ही मालिका २१ डिसेंबरपासून बुधवार ते शनिवार रात्री ९.३० वा. आपल्या भेटीस येत आहे.