Lokmat Most Stylish Award 2018: आदिनाथ कोठारे, प्रिया बापट ठरले 'मोस्ट स्टायलिश' नायक-नायिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 23:29 IST2018-12-19T23:29:14+5:302018-12-19T23:29:52+5:30
लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचं तिसरं पर्व

Lokmat Most Stylish Award 2018: आदिनाथ कोठारे, प्रिया बापट ठरले 'मोस्ट स्टायलिश' नायक-नायिका
मुंबईः 'माझा छकुला' या सिनेमातला गोंडस छकुला ते मराठी सिनेसृष्टीतला टॉल, डार्क अँड हँडसम हिरो असा प्रवास करून रसिकांची मनं जिंकणारा संवेदनशील अभिनेता आदिनाथ कोठारे आणि आपल्या निखळ हास्यानं, सहजसुंदर अभिनयानं सिनेनाट्यसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री प्रिया बापट यांना आज 'लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड'नं गौरवण्यात आलं. मुंबईच्या एका पंचताराकिंत हॉटेलमध्ये रंगलेल्या या पुरस्कार सोहळ्यात हिंदी-मराठी सिनेसृष्टीतील 'तारांगण' अवतरलं होतं.
वडिलांकडून मिळालेला अभिनयाचा, दिग्दर्शनाचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याचं काम आदिनाथ कोठारे अगदी मनापासून करतोय. झपाटलेला २, इश्कवाला लव्ह, सतरंगी रे, अवताराची गोष्ट या चित्रपटांमधून त्यानं आपल्या अभिनयगुणांचं दर्शन घडवलं. याशिवाय पडद्यामागे अनेक मालिकांच्या निर्मितीची धुराही तो समर्थपणे सांभाळतोय. 'गुणी मुलगा' या इमेजसोबतच त्याची स्टाइल आणि फिटनेसही वाखाणण्याजोगा आहे. त्याचीच पावती लोकमतच्या मोस्ट स्टायलिश अवॉर्डने दिली आहे.
प्रिया बापटचे दोन सिनेमे या वर्षात प्रदर्शित झाले. आम्ही दोघी आणि गच्ची या वेगळ्या धाटणीच्या सिनेमांमधून प्रियानं दोन वर्षांच्या ब्रेकनंतर आपली छाप पाडली. कधी पारंपरिक, तर कधी हायफाय लूकमध्ये दिसलेली प्रिया चाहत्यांना भावली. सिनेमांच्या पडद्यासोबतच तिच्या स्टाइलची चर्चा इंडस्ट्रीमध्ये ऐकायला मिळते.