बॉलिवूडमध्ये येण्याआधी हा प्रसिद्ध दिग्दर्शक होता डिलिव्हरी बॉय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 06:00 AM2020-01-05T06:00:00+5:302020-01-05T06:00:02+5:30
या दिग्दर्शकाला त्याच्या चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे.
भारतात संगीत आणि बॉलिवूड यांना एखाद्या धर्माइतकेच महत्त्व आहे. त्यामुळे ‘झी टीव्ही’ने या दोन्ही क्षेत्रातील सर्वोत्तम गोष्टींचा मिलाफ करणारा नवा कार्यक्रम येत्या वीकेण्डपासून सुरू करण्याचे ठरविले आहे. ‘झी टीव्ही’ने ‘प्रो-म्युझिक काऊंटडाऊन’ या नव्या संगीतमय चॅट कार्यक्रमाचे प्रसारण करण्याचा निर्णय घेतला असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतातील एक सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक असलेला आणि यूट्यूबवर विलक्षण लोकप्रियता मिळवलेला सिद्धार्थ कानन करणार आहे.
आजवर कधीही न अनुभवलेल्या आणि पाहिलेल्या शैलीतील या संगीतमय काऊंटडाऊन कार्यक्रमात बॉलिवूडची अत्यंत गाजलेली गीते एका वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने सादर तर होतीलच. पण बॉलिवूडचे सर्वोच्च कलाकार आपली कारकीर्द, प्रेमप्रकरणे तसेच वैयक्तिक जीवन वगैरेंबाबत स्वत: माहिती देतील.
‘प्रो-म्युझिक काऊंटडाऊन’ या नव्या संगीतमय चॅट कार्यक्रमाच्या नव्या भागात अभिनेत्यांबरोबर अगदी सहज संबंध ठेवणारा दिग्दर्शक मधुर भांडारकर आणि अभिनेता नील नितीन मुकेश हे मनमोकळ्या गप्पा मारताना दिसतील. या कार्यक्रमात मधुर तसेच नील नीतिन हे दोघे घनिष्ठ मित्र आपली मैत्री तसेच आपल्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीवर गप्पा मारतील. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक मधुर भांडारकर यावेळी वेगळ्या विषयांवरील आणि वेगळ्या पद्धतीने चित्रीत केलेल्या चित्रपटांवर गप्पा मारेल.
सूत्रसंचालक सिद्धार्थ काननने गेल्या 20 वर्षांच्या कारकिर्दीबद्दल विचारले असता जुन्या स्मृतींमध्ये रममाण होत मधुरने सांगितले, “मी अगदी सुरुवातीला डिलिव्हरी बॉयचं काम करायचो. मी चार वर्षं घरोघरी जाऊन लोकांना व्हिडिओ कॅसेटस देत असे. त्यावेळी व्हिडिओवर चित्रपट पाहताना मलाही आपण चित्रपटांचं दिग्दर्शन करावं, असे वाटले आणि आज 20 वर्षांनंतर मी एक दिग्दर्शक म्हणून ओळखला जात आहे. मी लहान असताना सेटवर जाऊन चित्रपटांचं चित्रीकरण पाहात असे. कारण मला पुढे काय करायचं आहे, ते आधीपासूनच मला ठाऊक होतं. अगदी मिथुनदाही मला व्हिडिओ कॅसेटचा डिलिव्हरी बॉय म्हणूनच ओळखतात. कारण मी त्यांच्याही घरी जाऊन त्यांना व्हिडिओ कॅसेटस दिल्या आहेत.”
तुझी आवडती अभिनेत्री कोण असे विचारल्यावर मधुरने तब्बूचे नाव घेतले आणि तो म्हणाला, “तब्बूसोबत मी चाँदनी बार हा चित्रपट केला आणि माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली. त्यात तिने तिची भूमिका ज्या प्रकारे साकारली, त्यामुळे केवळ तिच्याच नव्हे, तर माझ्या कारकिर्दीलाही नवे वळण मिळाले. मी जेव्हा एक अगदी फ्लॉप दिग्दर्शक म्हणून ओळखला जात होतो, तेव्हा तिने माझ्यावर विश्वास दाखवला आणि म्हणूनच माझं तिच्याशी अगदी खास नातं निर्माण झालं.”