यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 03:46 PM2024-11-18T15:46:32+5:302024-11-18T15:47:16+5:30
"मला असं कधीच वाटलं नाही की मी...", माधुरी दीक्षित काय म्हणाली?
९० च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) तेव्हाही आणि आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. 'भुल भूलैय्या ३' मध्ये तिने नुकतंच काम केलं. ब्लॉकबस्टर सिनेमाचा ती भाग झाली. त्यामुळे माधुरी सध्या चर्चेत आहे. मात्र माधुरीने यशाच्या शिखरावर असताना लग्न केलं आणि ती इंडस्ट्रीपासून दूर गेली असं नेहमीच म्हटलं जातं. यावर माधुरीने पहिल्यांदाच भाष्य केले आहे.
'भूल भुलैय्या ३' निमित्ताने माधुरी दीक्षित अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. नुकतंच 'गलाटा इंडिया' ला दिलेल्या मुलाखतीत माधुरीने करिअर आणि लग्न यावर भाष्य केलं. ती म्हणाली, "मला असं कधीच वाटलं नाही की मी प्रसिद्धीपासून दूर गेले आहे किंवा करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना लग्न करत आहे. असा विचार मी कधीच केला नाही. मला योग्य जीवनसाथी मिळाला आहे, तो हाच आहे ज्याच्याशी मला लग्न करायचं आहे आणि मी करेन हेच माझ्या डोक्यात होतं. प्रत्येक जण स्वत:साठी काहीतरी स्वप्न बघत असतो. माझ्यासाठी एक छान घर, चांगला नवरा, कुटुंब, मुलं हेच माझं स्वप्न होतं. मला मुलं खूप आवडतात. त्यामुळे आई होणं हा माझ्या स्वप्नाचा सर्वात महत्वाचा भाग होता. जेव्हा लोक म्हणतात की तू तर दूर गेली होती आणि तुला या प्रसिद्धीची आठवण येत असेल तर नाही, मी हे मिस केलं नाही. कारण मी माझं स्वप्नच तर जगत होते."
माधुरी दीक्षित सध्या 'भूल भुलैय्या 3' चं यश एन्जॉय करत आहे. शिवाय ती निर्मातीही आहे. माधुरीने काही मराठी सिनेमांचीही निर्मिती केली आहे. शिवाय त्यात अभिनयही केला आहे. आता तिच्या आगामी सिनेमांची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
माधुरीने १९९९ साली डॉ श्रीराम नेनेंशी लग्न केले. त्यांना दोन मुलं आहेत. लग्नानंतर माधुरी अमेरिकेतच स्थायिक झाली होती. गेल्या काही वर्षांपासून दोघंही पुन्हा भारतात शिफ्ट झाले आहेत.