श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 01:56 PM2024-11-17T13:56:18+5:302024-11-17T13:56:51+5:30
श्रीदेवी आणि माधुरी यांच्यात स्पर्धेमुळे कधी मैत्री होऊ शकली नाही. नुकतंच माधुरीने श्रीदेवीबद्दल काय वाटतं याचा खुलासा केला.
माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) सिनेसृष्टीतील 'धकधक गर्ल' म्हणून ओळखली जाते. ८० च्या काळात माधुरीने आपल्या सौंदर्य, नृत्य आणि अभिनयाने सर्वांनाच प्रेमात पाडलं होतं. तिच्या स्माईलवर तर प्रेक्षक घायाळ व्हायचे. त्याकाळी माधुरी आणि इतर अभिनेत्रींमध्ये कमालीची स्पर्धा असायची. श्रीदेवी आणि माधुरी यांच्यात स्पर्धेमुळे कधी मैत्री होऊ शकली नाही. नुकतंच माधुरीने श्रीदेवीबद्दल काय वाटतं याचा खुलासा केला.
'शोशा'ला दिलेल्या मुलाखतीत माधुरी म्हणाली, "आम्ही एकाही सिनेमात एकत्र काम केलं नाही. एका सिनेमात केलं पण आमचे एकत्र सीन्स नव्हते. आम्ही कधीच एकमेकांच्या मार्गात आलो नाही. नक्कीच आम्ही एकमेकींचा खूप आदर करायचो. एक अभिनेत्री म्हणून आणि तिने जे यश मिळवलं त्याबद्दल मला तिचा प्रचंड आदर होता. तिने अनेक भाषांमध्येही काम केलं जे कौतुकास्पद आहे. आणि ती यशस्वी अभिनेत्री बनली. ती सुद्धा खूप आदरयुक्त आणि चांगल्या स्वभावाची होती."
ती पुढे म्हणाली, "पुकार हा माझा सिनेमा बोनी कपूर यांनी निर्मित केला होता. त्यामुळे ती सुद्धा निर्मातीच होती. पण तेव्हाही आमच्यात फार बोलणं झालं नाही कारण ती तिचं काम करत होती मी माझं काम करत होते. त्यामुळे आम्ही भेटलोही नाही. पुकार बनला तेव्हा माझं लग्न झालं होतं. नंतर तो रिलीज झाला तेव्हा मी अमेरिकेला गेले होते. त्यामुळे आमच्यात कधी बोलणं झालं नाही. तसंच ती माझ्या आधी इंडस्ट्रीत आली. ती वयाच्या चौथ्या वर्षापासून काम करत होती. तिने इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली होती त्यामुळे मला तिच्याबद्दल कायम आदर वाटतो."
माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी ८० दशकाच्या काळात सर्वात आघाडीच्या अभिनेत्री होत्या. दिसायला सुंदर आणि दोघीही उत्तम डान्सरही होत्या. त्यामुळे त्यांच्यात कमालीची स्पर्धा असायची. अभिनेत्रींमध्ये लवकर मैत्री होत नाही तसंच या दोघींमध्येही कधीच मैत्री झाली नाही. तरी नुकतंच माधुरीने श्रीदेवीच्या आठवणीत तिच्यासोबतचं नातं कसं होतं हे सांगितलं.
माधुरी नुकतीच 'भूल भुलैय्या 3' मध्ये दिसली. सिनेमात कार्तिक आर्यन, विद्या बालन आणि तृप्ती डिमरीही मुख्य भूमिकेत होते. सिनेमाने जोरदार बिझनेस केला. त्यामुळे माधुरी पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये आली आहे.