उदित नारायणने सांगितले माधुरी दिक्षितच्या धक धक करने लगा या गाण्याबद्दलचे हे सिक्रेट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 06:30 AM2019-10-12T06:30:00+5:302019-10-12T06:30:02+5:30
द कपिल शर्मा शोमध्ये आपल्या ‘धक धक करने लगा’ या प्रसिद्ध गाण्यामागील प्रेरणा कोण होती, याचा खुलासा उदित नारायणने केला.
गायक उदित नारायण त्याच्या ‘टिप टिप बारसा पानी’, ‘कहो ना प्यार है’ यांसारख्या प्रसिद्ध रोमॅंटिक गाण्यांसाठी ओळखला जातो. त्याने अलीकडेच द कपिल शर्मा शोमध्ये आपल्या ‘धक धक करने लगा’ या प्रसिद्ध गाण्यामागील प्रेरणा कोण होती, याचा खुलासा केला. उदित नारायण त्याची पत्नी दीपा नारायण आणि मुलगा आदित्य नारायण यांच्यासोबत विनोदवीर कपिलच्या शोमध्ये दिसणार आहे. इंडियन आयडॉल 11 मध्ये सूत्रसंचालक म्हणून येण्यास सज्ज असलेला आदित्य आपल्या वडिलांच्या काही गंमतीदार महिला चाहत्यांबद्दल सांगणार असून त्यांच्या जीवनातील काही संस्मरणीय आठवणी देखील उलगडणार आहे.
उदित नारायणशी गप्पा मारताना कपिल शर्माने त्याला विचारले की, धक धक करने लगा हे गाणे म्हणत असताना त्याच्या मनात काय होते? मनात अनिल कपूर होता की माधुरी दीक्षित होती? त्यावर उदित नारायणने कबूल केले की, “अनिल कपूर खूप देखणा आहे, यात काही शंकाच नाही, पण खरे सांगायचे तर, हे गाणे म्हणताना माझ्या मनात माधुरी होती. तिची गोष्टच काही वेगळी आहे...” यावर कपिलने पुढे त्याला विचारले की, त्या सुंदर अभिनेत्रीसोबत पडद्यावर येता आले नाही आणि केवळ तिच्या नायकाचा आवाज देण्यावर समाधान मानावे लागले, याची खंत त्याला वाटते का? त्यावर उदित नारायण म्हणाला, “नाही, मला जराही खंत वाटत नाही, कारण मला पहिल्यापासून गायकच व्हायचे होते.”
या कार्यक्रमात उन्नीस बीस या चित्रपटात मोहम्मद रफी यांच्यासोबत गाण्यासाठी उदित नारायणने केलेल्या खटपटीबद्दल सांगितले. उदित हा एका शेतकर्याचा मुलगा आहे आणि जेव्हा त्याने संगीत क्षेत्रात खटपट करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याला काहीच पार्श्वभूमी नव्हती. तो सांगतो, “मला कसेही करून प्रसिद्ध संगीतकारांच्या डोळ्यात यायचे होते. म्हणून मी दररोज चालत चालत राजेश रोशनच्या स्टुडिओमध्ये जायचो, या आशेने की कधी तरी ते माझी दखल घेतील. तसे व्हायला 2 वर्षं लागली. शेवटी एकेदिवशी मी धाडस करून त्यांना सांगितले की, “राजेशजी माझे गाणे ऐकून घ्या.”
उन्नीस बीस चित्रपटाबद्दल बोलताना उदित नारायणने सांगितले की, राजेशजी मोहम्मद रफीसोबत गाण्यासाठी एका मोठ्या गायकाच्या शोधात होते, पण त्यांना तो गायक मिळत नव्हता. उदित नारायण पुढे म्हणाले, “तेव्हा कुणी तरी त्यांना माझे नाव सांगितले. पण माझा संपर्क कसा साधावा हे राजेशजींच्या लक्षात येत नव्हते. मला शोधण्यासाठी त्यांनी तिघा जणांना तीन ठिकाणी पाठवले... फेमस स्टुडिओ, फिल्म सेंटर आणि भारतीय विद्या म्युझिक क्लासेस.” अशा प्रकारे उदित नारायणला रफीसोबत चित्रपटात गाण्याची संधी मिळाली. तो त्यांच्यासाठी स्वप्न सत्यात आणणारा क्षण होता.