धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा 50वा वाढदिवस
By Admin | Published: May 15, 2017 02:44 PM2017-05-15T14:44:35+5:302017-05-15T14:51:09+5:30
बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा आज 50वा वाढदिवस आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा आज 50वा वाढदिवस आहे. आपल्या दमदार अभिनयानं सिनेरसिकांवर मोहिनी घालणा-या माधुरीचा जन्म 15 मे 1967 साली मुंबईमध्ये झाला होता. तिनं अभिनयासोबत प्रेक्षकांना आपल्या नृत्याचेही वेड लावले. बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत माधुरीच्या नावाचाही समावेश आहे. दरम्यान, काही वर्षांपासून माधुरी इंडस्ट्रीपासून दूर गेली आहे, मात्र तिची एक झलक पाहण्यासाठी आजही तिचे चाहते अधीर असतात.
2014मध्ये आलेल्या "गुलाब गँग" हा माधुरी दीक्षित सिनेरसिकांना पाहायला मिळाली होती. सिनेमांव्यतिरिक्त माधुरी छोट्या पडद्यावरील डान्स रिअॅलिटी शो "झलक दिखला जा - 4" या कार्यक्रमाची परिक्षकही राहिली आहे.
वाढदिवसानिमित्त माधुरी दीक्षितबद्दलच्या स्पेशल गोष्टी जाणून घेऊया
1. माधुरीनं 1984 मध्ये राजश्री प्रॉडक्शनचा सिनेमा "अबोध" द्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. या सिनेमाला प्रेक्षकांनी फारशी पसंती दिली नाही. मात्र माधुरीच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झाले.
2. 1998 साली "तेजाब" सिनेमामुळे माधुरीनं यशाच्या शिखरावर पाऊल ठेवलं. तेव्हापासून तिची यशस्वी घौडदौड सुरू झाली. या सिनेमापूर्वी तिनं 8 सिनेमांमध्ये काम केलं होतं. मात्र ते सर्व सिनेमा बॉक्सऑफिसवर अपयशी ठरलेत. एन. चंद्रा यांनी "तेजाब" सिनेमामध्ये माधुरीवर चित्रित केलेले "एक दो तीन..." हे गाणं आजही तितकंच प्रसिद्ध आहे. तेजाबची मोहिनी (माधुरी) आणि मुन्ना (अनिल कपूर) जोडी प्रेक्षकांच्या आजही चांगलीच लक्षात आहे.
3. "तेजाब"ची हिट जोडी पुन्हा एकदा दिसली सुभाष घई यांचा सिनेमा "राम-लखन"मध्ये. या सिनेमात माधुरी दीक्षित व अनिल कपूर व्यतिरिक्त जॅकी श्रॉफ आणि डिंपल कपाडिया यांचीही महत्त्वाची भूमिका होती. या सिनेमानंतर माधुरीनं कधीही मागे वळून पाहिलं नाही आणि एकापाठोपाठ एक हिट सिनेमे तिने इंडस्ट्रिला दिले. "परिंदा", "त्रिदेव", "किशन-कन्हैया" आणि "प्रहार" यांसारखे सुपरहिट सिनेमे माधुरीने दिलेत.
4. 1990 साली माधुरीनं आमिर खानसोबत "दिल" या सिनेमामध्ये काम केले होते. या सिनेमासाठी तिला फिल्म फेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला होता.
5. राजश्री प्रॉडक्शनसोबत आपल्या कारर्कीदीला सुरुवात करणा-या या अभिनेत्रीनं 1994 साली सलमान खानसोबत "हम आपके है कौन" या सिनेमामध्ये काम केले. हा सिनेमा आजही घराघरात आवडीनं पाहिला जातो. माधुरी आणि सलमानच्या जोडीला प्रेक्षकांनी प्रचंड पसंती दिली.
6. माधुरीचं नाव अनिल कपूरपासून ते संजय दत्तपर्यंत जोडले गेले. "राम लखन" सिनेमाच्या शुटिंग दरम्यान तिचे नाव अनिल कपूरसोबत जोडले गेले होते. तर "साजन" सिनेमादरम्यान संजय दत्त आणि माधुरीची जवळीक वाढल्याची प्रचंड चर्चा होती. मात्र, त्यांचं हे नातं फार काळ टिकू शकले नाही. कारण टाडानं अवैधरित्या शसास्त्र बागळल्याप्रकरणी संजय दत्तला कोर्टानं तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर माधुरी-संजयचं नातं संपुष्टात आले.
7. 1997 मध्ये यश चोप्रा यांचा "दिल तो पागल है" हा रोमॅन्टिक सिनेमा आजही टीव्ही लागल्यास प्रेक्षक तो आवडीनं व सवडीनं पाहतात. सिनेमामध्ये माधुरीव्यतिरिक्त शाहरुख खान, अक्षय कुमार आणि करिश्मा कपूर यांच्याही मुख्य भूमिका होत्या. या सिनेमातील गाणीही मोठ्या प्रमाणात गाजली.
8. माधुरीनं "बेटा", "साजन", "देवदास" आणि "राजा" यांसारखे हिट सिनेमांमध्ये काम केले. यानंतर 2013मध्ये रणबीर कपूर आणि दीपिका पाडुकोण या जोडीचा सिनेमा "ये जवानी है दीवानी" सिनेमामध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारत "घाघरा..." या गाण्यावर भारी ठुमके लावले होते.
9. माधुरीनं बॉलिवूडमध्ये अनेक शानदार सिनेमांमध्ये काम केलं. पण बॉलिवूडमधील एखाद्या नायकासोबत लग्न करण्याऐवजी तिनं डॉ. श्रीराम नेने यांना आयुष्याचा जोडीदार बनवलं. या क्युट कपलला दोन मुलं आहेत ज्यांची नावं रेयान आणि एरेन अशी आहेत.
10. माधुरीच्या नृत्यकलाविष्काराची प्रेक्षक वाहवाई करतात. गेल्या वर्षी तिनं स्वतः कतरिना कैफ, दीपिका पाडुकोण, ऐश्वर्या राय-बच्चन आणि सोनाक्षी सिन्हा सहीत अन्य अभिनेत्रीदेखील चांगलं नृत्य करतात, असे विधान केले होते.