डॉ. नेने यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त लिहिली माधुरी दीक्षितसाठी खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 08:55 AM2024-10-18T08:55:23+5:302024-10-18T08:56:16+5:30
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित १९९९ मध्ये विवाहबंधनात अडकली होती.
बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) सध्या सतत चर्चेत आहे. काही वर्षांपूर्वी माधुरी दीक्षितने व्यवसायाने डॉक्टर असलेल्या श्रीराम नेनेंची आपल्या जोडीदाराच्या रुपात निवड केली. 17 ऑक्टोबर 1999 मध्ये माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने लग्नगाठीत अडकले होते. 17 ऑक्टोबर 1999 पासून ते आजपर्यंत माधुरी आणि नेने यांचा सुखाचा संसार सुरू आहे. शुुक्रवारी त्यांनी आपल्या लग्नाचा २५ वा वाढदिवस साजरा केलाय. यानिमित्ताने दोघांनी रोमँटिक पोस्ट शेअर करत एकमेकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
डॉ. श्रीराम नेने यांनी एक गोड व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये एका कार्यक्रमात डॉ. नेने माधुरीला लग्नाची मागणी घालताना पाहायला मिळत आहेत. तसेच यात नेने यांनी अनेक जुने फोटो देखील शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहलं, "दोन हृदयं जी कायम एकत्र असतात. माझी साथीदार, माझी प्रियकर तुला २५ व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा! माझ्यासाठी तू या ग्रहावरची सर्वात सुंदर स्त्री आहेस. तुझं मन खूप मोठं आहे आणि तुझं स्मितहास्य खूपच सुंदर आहे. आता जवळपास अर्ध आयुष्य आपण एकत्र काढलंय. आपल्या आयुष्यातील ही सगळी वर्षं खूपच सुंदर होती. मुलांना एकत्र वाढवणं… एकत्र मजा करणं सगळं काही सुंदर आहे. आता इथून पुढे एकमेकांना अशीच कायमस्वरुपी साथ देऊयात".
तर माधुरीनेही एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यामध्ये माधुरी आणि डॉ. श्रीराम नेने यांचे अनेक फोटो पाहायला मिळत आहेत. कॅप्शनमध्ये माधुरीने लिहलं, "25 वर्ष प्रेम, हास्य आणि तुझ्यासोबतच्या असंख्य आठवणी. लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा". या पोस्टवर नेटकऱ्यांनीही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. डॉ. नेनेंसोबत लग्नगाठ बांधल्यानंतर माधुरी दीक्षित अमेरिकेतच स्थायिक झाली होती. काही वर्षांपूर्वीच दोघंही भारतात परतले आहेत. या जोडप्याला आता अरिन आणि रयान अशी दोन मुलं आहेत.