आकलनापलीकडील आवाजाची जादू

By Admin | Published: February 6, 2015 10:56 PM2015-02-06T22:56:43+5:302015-02-06T22:56:43+5:30

चित्रपटसृष्टीत आवाजाला अत्यंत महत्त्व आहे. काही चित्रपटांचे यश त्यावरही अवलंबून असते. अभिनयाबरोबर आपल्या आवाजाने अमिताभ बच्चन यांनी जगाला वेड लावले आहे.

The magic of the voice beyond imagination | आकलनापलीकडील आवाजाची जादू

आकलनापलीकडील आवाजाची जादू

googlenewsNext

चित्रपटसृष्टीत आवाजाला अत्यंत महत्त्व आहे. काही चित्रपटांचे यश त्यावरही अवलंबून असते. अभिनयाबरोबर आपल्या आवाजाने अमिताभ बच्चन यांनी जगाला वेड लावले आहे. मात्र एकेकाळी याच आवाजाला आॅल इंडिया रेडिओने बाद केले होते. त्यानंतर मात्र चित्रपटसृष्टीत अमिताभ यांनी जे यश मिळवले, त्यात त्यांच्या आवाजाचेही योगदान मोठे आहे. अमिताभ यांच्या आवाजाच्या जादूचा पुरेपूर वापर ‘शमिताभ’ चित्रपटात आऱ बाल्की यांनी केला आहे.
महाराष्ट्रातल्या इगतपुरीत राहणारा दानिश (धनुष). मुक्या असलेल्या दानिशला लहानपणापासूनच चित्रपटांचे वेड आणि हीरो बनण्याची इच्छा असते. आईचे निधन झाल्यावर तो मुंबई गाठतो. येथे आल्यावर मुका असल्याने त्याला अनेक वाईट अनुभव येतात. दरम्यान, चित्रपटसृष्टीतल्या दिग्दर्शकाची साहाय्यक असलेल्या अक्षरा (अक्षरा हसन)शी त्याची भेट होते. ती त्याला मदत करते. पण मुकेपणामुळे त्याला चित्रपटसृष्टीत संधीच मिळत नाही. अशातच दानिशला परदेशात जाण्याची संधी मिळते. तेथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आॅपरेशन करून त्याच गळ््यात एक चीप बसवली जाते. यामुळे तो कोणाचाही आवाज ग्रहण करून त्याप्रमाणे बोलू शकणार असतो. हे नवे तंत्र वापरून दानिश भारतात परततो आणि चांगल्या आवाजाचा शोध घ्यायला सुरुवात करतो. हा शोध अमिताभ सिन्हांपाशी (अमिताभ बच्चन) येऊन थांबतो. स्मशानात राहणाऱ्या अमिताभचा आवाज बुलंद आहे. पण आवाजामुळे आपल्याला चित्रपटसृष्टीने डावलल्याचे शल्य त्याच्या मनात आहे. त्यामुळे त्यांनी दारू जवळ केली आहे. दानिश आणि अमिताभची भेट होते. त्याची परिस्थिती ऐकून दानिशचा आवाज बनण्यासाठी अमिताभ तयार होतो. दानिश शमिताभ या नावाने इंडस्ट्रीत येतो आणि सुपरस्टार बनतो. पण त्याच्या आवाजाचे खरे रहस्य काय आहे, ते कोणालाच माहीत नसते. यश मिळाल्यानंतर दोघांच्यात मतभेद होऊन ते वेगळे होतात. पण दोघांनाही एकमेकांची गरज आहे याची त्यांना जाणीव होते. दोघे पुन्हा परत एकत्र येतात आणि शेवटी अनेक गमतीजमती घडतात.
चित्रपटाची वैशिष्ट्ये : संपूर्णपणे अमिताभमय असलेला हा चित्रपट आहे. त्यांच्या आवाज आणि अभिनयाची जादू संपूर्ण चित्रपटात प्रभाव पाडून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते. आऱ बाल्की यांनी पुन्हा अमिताभला वेगळ््या पद्धतीने पण सहजसुंदरतेने पेश केले आहे. अमिताभ आवाजाचा शहेनशाह आहे, हे चित्रपट पाहताना पुरेपूर जाणवते. कमल हसनची मुलगी अक्षराने या पहिल्याच चित्रपटात आत्मविश्वासाने काम केले आहे. तिचा आवाज प्रभाव पाडत नसला तरी तिचे डोळे, हेअरस्टाईल आणि बॉडीलँग्वेजमुळे ती उठून दिसते. चित्रपटात पाहुण्या कलाकारांमध्ये अनेक मोठे कलाकार दाखवले असले, तरी रेखाने खरी मजा आणली आहे. चित्रपटाचे संवाद प्रभाव पाडतात. इलायराजाचे संगीतही सुंदर आहे. तांत्रिकदृष्ट्याही चित्रपट जबरदस्त असून, तो पाहताना मजा येते.
चित्रपटाच्या उणिवा : याआधी दोन दर्जेदार चित्रपट दिलेले दिग्दर्शक आऱ बाल्की मात्र या चित्रपटात थोडे कमी पडले आहेत. त्याचे प्रमुख कारण म्हणजे चित्रपटाचा असंतुलितपणा. सुरुवातीपासूनच चित्रपटात गडबड दिसून येते. दानिशने चित्रपटात येण्याचा सिक्वेन्स तसेच त्याचे मुकेपण वगैरे गोष्टी अति ताणल्या आहेत. अमिताभची एंट्री झाल्यावर तर संपूर्ण चित्रपट कथेसह त्यांच्याभोवतीच फिरतो.
अमिताभ आणि सुपरस्टार शमिताभ यांच्यातला वादही गोंधळलेला वाटतो. सगळ््यात मोठी चूक म्हणजे धनुष आणि अमिताभ यांच्या भूूमिका एकमेकांत मिसळून वेगळं दाखवण्याच्या नादात चित्रपटातली सहजता संपली आणि गोंधळच वाढला आहे. अक्षराच्या भूमिकेवरही जास्त लक्ष दिलेले नाही. धनुषने मेहनत केली असली तरी त्याची भूमिका विश्वसनीय वाटत नाही. शमिताभच्या भूमिकेच्या गरजेनुसार धनुष अनफिट वाटतो. चित्रपटाचा शेवट धमाकेदार असला तरी अनेक प्रेक्षक त्यामुळे निराश होतील. तसेच हळूहळू चित्रपट वेगळ््या वळणावर येऊन ठेपल्याने सामान्य प्रेक्षकांच्या आकलनापलीकडे जातो. त्यांचे मनोरंजन होत नाही. अमिताभवर असलेले अतिप्रेम या चित्रपटात मात्र बाल्कींना भारी पडले आहे.

हिंदी चित्रपट
अनुज अलंकार

Web Title: The magic of the voice beyond imagination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.