महामिनिस्टर: हिरेजिडत ११ लाखांची पैठणी आहे खास; दिव्यांग व्यक्तींनी स्वत: तयार केलीये ही साडी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 02:51 PM2022-04-08T14:51:42+5:302022-04-08T14:52:23+5:30
MahaMinister: येत्या ११ एप्रिलपासून झी मराठीवर महामिनिस्टर हा कार्यक्रम सुरु होणार आहे. यात विजेत्या वहिनींना ११ लाखाची पैठणी मिळणार आहे.
सध्या मराठी कलाविश्वात होम मिनिस्टरच्या नव्या पर्वाची म्हणजेच महामिनिस्टरची चर्चा रंगली आहे. आतापर्यंत प्रत्येक घराघरात जाऊन स्त्रियांचा सन्मान करणारे आदेश भाऊजी या महामिनिस्टर पर्वात विजेत्या महिला स्पर्धकाला चक्क ११ लाखांची साडी देणार आहेत. त्यामुळे सध्या या नव्या पर्वाची चर्चा रंगली आहे. परंतु, एकीकडे या पर्वाची चर्चा होत असतानाच बऱ्याच प्रमाणात त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. मात्र, आता या चर्चांमध्ये ही ११ लाखांची पैठणी इतकी खास का आहे याच्यामागचं कारण समोर आलं आहे.
येत्या ११ एप्रिलपासून झी मराठीवर महामिनिस्टर हा कार्यक्रम सुरु होणार आहे. यात विजेत्या वहिनींना ११ लाखाची पैठणी मिळणार आहे. त्यामुळे सध्या हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर चर्चिला जात आहे. त्यातच नाशिकमधून या महामिनिस्टरला जोरदार प्रतिसाद मिळाला असून येथून १०० महिलांची निवड करण्यात आली आहे. तसंच ही पैठणी खास असण्यामागचं कारण आदेश बांदेकर यांनी सांगितलं आहे.
"ही ११ लाखांची पैठणी कशी असेल हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांप्रमाणेच मला देखील आहे. आता महामिनिस्टरमध्ये विजेत्या वहिनीला जी ११ लाखांची पैठणी देण्यात येणार आहे ती पैठणी नाशिक जिल्ह्यातील येवला येथून खरेदी होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने येवल्याच्या पैठणी उद्योगाला बळ मिळेल, असं आदेश बांदेकर म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "इतकंच नव्हे तर या ११ लाखांच्या पैठणीच वैशिष्ट्य असं आहे की, ही पैठणी दिव्यांग कारागिरांनी बनवली आहे. महाराष्ट्र महावस्त्र असलेल्या या पैठणीवर जरी सोन्याची जर आणि हिरे असले तरी ते नक्षीकाम करणारे कारागीर पण खास आणि प्रतिभावान आहेत यापेक्षा कौतुकाची बाब काय असेल."